क्वालिटी टाईम.
माझ्य वाचक मित्रांनो ! सध्याच्या धकाधकीच्या युगात एक गोष्ट महाग झाली आहे,ती म्हणजे वेळ ! लोकांना एकवेळेस इतरांना पैसे देणे सहजसोपं वाटतं परंतु वेळ देणं अवघड वाटतं.कुटुंबातील लोकसुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.प्रत्येकजण नोकरी- व्यवसायाच्या मागे धाव- धाव धावतोय.टीचभर पोटाच्या खळगीसाठी जीवन महाग झालंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं.... मला वेळ नाही. वेळच मिळत नाही. अगदी स्वतःसाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटूंबासाठीही. मुलांसाठी पालकांना वेळ काढणं अवघड झालं आहे .मुलांना नक्की काय हवं असतं ? मुलांना जर उत्तम घडवायचं असेल,त्यांना अनुभवसमृद्ध बनवायचं असेल तर पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देणं आवश्यक आहे. काही पालकांना वाटतं मुलांना खूप सारी खेळणी दिली,खूप खाऊ दिला,भारी-भारी ड्रेस दिले,शाळेची सर्व फी भरली,वह्या-पुसतकं दिली म्हणजे आपलं काम झालं.परंतु या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेच. परंतु त्या सर्वांहूनही महत्त्वाचं आहे तो म्हणजे मुलांना वेळ देणं.मुलांना त...