राग

        माझ्या वाचक मित्रांनो!

          काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे.

        रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे. 

        राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न करताच करतो. व त्याचे परिणाम वाईटही होऊ शकतात. मराठीत म्हण आहे.."आला राग नी भिक माग ". राग आल्यावर परिस्थिती हाताळणं,हाताबाहेर जाऊ न देणं आपल्याच हाती असतं. आवश्यक असतो फक्त मनाचा संयम.

         बरं राग का येतो? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.राग येण्याचे कारण म्हणजे  आपल्या मनात पक्क्या झालेल्या आपल्या आवडी-निवडी,मनात खोलवर रूतलेले व रूजलेले आपले विचार,भावना.इतराबद्दल ठरवलेले अंदाज. 

आपण काही बोलल्यावर समोरच्याने कसं बोलावं,कसं वागावं हे आपण गृहीत धरतो. आणि मग समोरचा आपल्या मनासारखा बोलला नाही,वागला नाहीतर आपल्याला राग येतो. आपली तळपायाची आग मस्तकात जाते. 

       म्हणजे बऱ्याचदा आपण इतरांना गृहीत धरतो.आपल्याला हवंतसं समोरच्यानं बोलावं,वागावं,कृती करावी असं आपल्याला वाटतं,परंतु आपण प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं तर समोरच्याला आपण गृहीत धरणार नाही. आपल्याप्रमाणेच इतरांचे काही विचार असतात हे एकदा मान्य केलं की,आपल्याला समोरच्याचा फारसा राग येणार नाही.

      आपण प्रत्येक वेळी सर्व बाबींचा दोन्ही बाजूंनी विचार करावा.दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करावा.एकांगी विचार करू नये.समोरचा असं का बोलला?असं का वागला? याचा सारासार विचार करावा. समोरच्याला समजून घ्यावं. 

     एका शाळेतील असाच एक प्रसंग..एक विद्यार्थी दररोज शाळेत उशीरा यायचा. विचारल्यावर काही उत्तर देत नसायचा. त्यामुळे त्या वर्गशिक्षकांना खूपच राग यायचा. ते त्याला दररोज शिक्षा करायचे. तरीही तो दररोज उशीरा यायचा. मग त्या शिक्षकांनी याच्या मुळाशी जायचं ठरवलं. तेव्हा त्यांना समजलं. त्या मुलाला वडील नाही. आई घरी आजारी असते. भावंडं लहान आहेत. म्हणून तो मुलगा दररोज सकाळी लवकर एके ठिकाणी कामाला जातो. खाण्यापुरते पैसे कमावतो. आणि मग उशीरा शाळेत येतो. हे सर्व समजल्यावर शिक्षकांना त्या मुलाचा राग येईनासा झाला. उलट ते त्याला समजून घेऊ लागले.त्या मुलाविषयी शिक्षकांच्या मनात प्रेम- सहानुभूती निर्माण झाली. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपण त्या समजून घेणं आवश्यक आहे.

            राग नियंत्रित करणं सहज शक्य आहे.त्यासाठी आवश्यक आहे संयम. असं म्हणतात "जो राग जिंकेल तो जग जिंकेल ". आपल्या रागावर आपण नियंत्रण ठेवले तर आपणही खूश राहू शकतो. आणि इतरांनाही आपण आनंदी ठेऊ शकतो. 

     चला तर मग आपणही आपल्या रागावर नियंत्रण करूयात...

    पाहा,वाचा,विचार करा आणि सगळ्यात महत्वाचे कृतीही करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर

राग व्यवस्थापन