कृष्ण व्हा..

  

         माझ्या बालमित्रांनो,आणि वाचकमित्रांनो! 

           अनेक जण जीवन जगताना जीवनाबद्दल,परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल,नातेवाईकांबद्दल अनेकदा तक्रारी करताना दिसतात.मला चांगले नातेवाईकच नाहीत,मला जास्त वेळच मिळत नाही. मला समाधानच मिळत नाही...काही-काही जण तर मला चांगलं घरंच मिळालं नाही अशीही तक्रार करतात. खरं तर प्रत्येकाकडेच अडचणी,तक्रारी,समस्या या असतातच. परंतु जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टीकोन असेल तर माणूस परिस्थिती आणि पर्यायाने सर्व कमी - अधिक गोष्टी स्वीकारतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. आणि आनंदी राहतो. 

      जन्म आणि मृत्यू यांमधील अंतर म्हणजे जीवन होय.जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु जीवन कसं जगायचं,परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे मात्र आपल्याच हाती असतं. आहे त्यात समाधान मानायचं की, नाही त्याचं दुःख करत बसायचं हे सर्वस्वी आपल्याच हाती असतं. जीवनाकडे कसं पाहावं हे सांगताना कवीश्रेष्ठ मंगेश पाडगांवकर एका कवितेत म्हणतात...

 "सांगा कसं जगायचं,

कण्हत कण्हत की गाणं म्हणत. 

तुम्हीच ठरवा...

पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं , आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. 

भरला आहे म्हणायचं ,की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा...

     जीवनाकडे आपला बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे त्यावर सर्वच गोष्टी अवलंबून असतात. इतिहासाचा मागोवा घेतला तर काही यशस्वी लोक,महापुरूष,संत विचारवंत मात्र आपल्याकडे काही नाही,आता मी काय करू ? अशी तक्रार करत बसले नाही. आपल्याकडे काही नाही याचा विचार करत वेळ वाया घालवण्यापेक्षा ते नवनिर्माण करत राहिले. आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. 

      कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच 

आई- वडिलांपासून वेगळा झाला. नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.नसणाऱ्या आणि हातातून निसटलेल्या गोष्टींचा कृष्णाने विचार केला नाही,किंवा कोणाकडे तक्रारही केली नाही. सतत नवनवीन गोष्टी व विचार करत राहिला. भूतकाळापेक्षा वर्तमानात जगत राहिला. जे गेलं त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद मानत राहिला. नसण्याचा  आणि असण्याचाही सोहळा करत राहिला.

     ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे....सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

          आपणही कृष्ण होण्याचा प्रयत्न केला तर ......

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर

राग व्यवस्थापन