क्वालिटी टाईम.
माझ्य वाचक मित्रांनो !
सध्याच्या धकाधकीच्या युगात एक गोष्ट महाग झाली आहे,ती म्हणजे वेळ ! लोकांना एकवेळेस इतरांना पैसे देणे सहजसोपं वाटतं परंतु वेळ देणं अवघड वाटतं.कुटुंबातील लोकसुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.प्रत्येकजण नोकरी- व्यवसायाच्या मागे धाव- धाव धावतोय.टीचभर पोटाच्या खळगीसाठी जीवन महाग झालंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं.... मला वेळ नाही. वेळच मिळत नाही. अगदी स्वतःसाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटूंबासाठीही.
मुलांसाठी पालकांना वेळ काढणं अवघड झालं आहे .मुलांना नक्की काय हवं असतं ? मुलांना जर उत्तम घडवायचं असेल,त्यांना अनुभवसमृद्ध बनवायचं असेल तर पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देणं आवश्यक आहे. काही पालकांना वाटतं मुलांना खूप सारी खेळणी दिली,खूप खाऊ दिला,भारी-भारी ड्रेस दिले,शाळेची सर्व फी भरली,वह्या-पुसतकं दिली म्हणजे आपलं काम झालं.परंतु या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेच. परंतु त्या सर्वांहूनही महत्त्वाचं आहे तो म्हणजे मुलांना वेळ देणं.मुलांना त्यांच्या वाढत्या वयात,जडणघडणीच्या काळात हवा असतो पालकांचा संवाद,सहवास आणि वेळ.
परंतु सध्याच्या काळाचा विचार केला तर किती पालक आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ (क्वालिटीटाईम) देतात.? किती पालक आपल्या मुलांशी उत्तम संवाद साधतात? केवळ एका घरात राहणं म्हणजे संवाद आणि सहवास होत नाही. केवळ सोबत राहणं म्हणजे वेळ देणं नाही. तर आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीत समरस होणं म्हणजेच वेळ देणं होय. मग मुलांच्या अभ्यासात सहभागी होणं,स्वतःचं वय विसरून मुलांबरोबर खेळणं म्हणजे, मुलांना वेळ देणं होय.आपल्या मुलांशी सर्व विषयांवर दिलखुलास बोलणं म्हणजे खरा संवाद साधणं होय.तोच मुलांसाठी खरा क्वालिटी टाईम असेल.
आपल्या मुलांसाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे.आपण कितीही व्यस्त असलो तरीही मुलांसाठी दररोज थोडा वेळ काढलाच पाहिजे. मग एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. आणि मुलांचं बालपण निघून गेलं की तेही परत येत नाही. आपण आपल्या मुलांचे पहिले मित्र झालो पाहिजे. आपली मुलं विश्वासानं आपल्याशी मनमोकळी बोलली पाहिजेत. जे पालक आपल्या मुलांना वेळ देतात,त्यांच्याशी उत्तम संवाद साधतात ती मुलं आयुष्यात यशस्वी होतात. त्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ती मानसिकदृष्ट्या सक्षम होतात. आपले आईवडील आपल्याला वेळ देतात,आपल्या सोबत आहे यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल होतात. आणि अशीच मुलं मोठी झाल्यावर आपल्या पालकांना वेळ देतात आणि त्यांची उत्तम काळजीही घेतात.
सध्या मुलं आणि आईवडील यांमधील संवाद हरवत चाललाय. पालक मुलांना वेळ देत नाहीत. यामुळे मुलं आणि पालक यांच्यातील दरी वाढत चालली आहे.मुलांना पालकांचा फारसा सहवास लाभत नाही.पालकांजवळ आपलं मन मोकळं करता येत नाही.किंबहुना पालकांना आपल्यासाठी वेळच नाही असं मुलांना वाटतं. त्यामुळे मुलं असुरक्षित होत चालली आहेत. एकलकोंडी होत चालली आहेत. त्यांना बाहेरच्या मित्रमैत्रिणींची गरज भासू लागली आहे.बाहेरचे मित्रमैत्रिणी कसे भेटतील याचा काय नियम?त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांशी वेळीच संवाद साधा. त्यांना वेळ द्या.
मुलांना वेळ देणं किती महत्त्वाचे आहे. अशीच एक वास्तव कथा. गोपाळ नावाचा एक मुलगा होता. त्याला त्याचे वडील खेळणी,भारीतले कपडे,खाऊ सगळं घेऊन द्यायचे.आणि मागेल तेवढे पैसेही द्यायचे. कारण गोपाळचे बाबा चांगल्या कंपनीत कामाला होते. त्यांना भरपूर पगार होता. फक्त त्यांच्याकडे गोपाळ साठी द्यायला वेळ नव्हता. ते सकाळी लवकर जायचे व रात्री उशीरा यायचे. गोपाळला आपल्या बाबांचा सहवास हवा होता. प्रेम,माया हवी होती. बाबांचा वेळ हवा होता. पण ते काही त्याला मिळत नव्हतं. एकदिवस रात्रीचे दहा वाजले होते. गोपाळ बाबांची वाट पाहत होता. बाबा 11 वाजता घरी आले. गोपाळ त्यांच्या जवळ गेला. त्यांच्याशी बोलू लागला. बाबा कंटाळले होते. ते काही नीट बोलत नव्हते. गोपाळनी बाबांना विचारलं,"बाबा तुम्हांला एका तासाचे किती पैसे मिळतात हो?". बाबा चिडून म्हणाले गोपाळ मी खूप दमलोय,असले फालतू प्रश्न विचारू नकोस. तरीही गोपाळ ऐकेना तेव्हा बाबांनी सांगितले मला एक तासाचे 500 रूपये मिळतात. गोपाळ व बाबा दोघेही निघून गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळचे बाबा उठले तर त्यांच्या लक्षात आले. आपल्या शेजारी कसलेतरी पाकिट आहे.बाबांनी ते पाकिट उघडले तर त्यात 500 रूपये होते. व आत एक चिठ्ठीही होती. बाबा चिठ्ठी वाचू लागले.गोपाळने लिहिले होते. बाबा तुम्ही तुमचा एक तास मला द्याल का? आज एक तास लवकर घरी याल का? मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे.तुम्हांला खूप काही सांगायचं आहे. मला पैसे नको,खेळणी नको,भारीतले कपडे नको. मला तुमचा वेळ हवा आहे,मला तुम्ही हवे आहात...द्याल का बाबा मला वेळ? याल का आज लवकर घरी?
बाबांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या लक्षात आलं आपण पैशाच्या,कामाच्या मागे लागून आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करतोय. त्याला आपण हवे आहोत. त्यांनी गोपाळला घट्ट मिटी मारली व अक्षरक्षः रडू लागले व म्हणाले गोपाळ तू माझे डोळे उघडलेत. अशी चूक मी पुन्हा करणार नाही.आता दररोज लवकर घरी येईल. आपण खूप मजा करत जाऊ.
विचार करा या गोष्टीतील गोपाळ व बाबा आपण तर नाही ना?? आपण आपल्या मुलांना वेळ देतो ना??
पाहा,वाचा,विचार करा आणि आपल्या मुलांना वेळ द्यायला विसरू नका.
खूप सुंदर वास्तव आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
उत्तर द्याहटवासर एकदम बरोबर आहे
उत्तर द्याहटवा