एकविसी
शुक्रवार ,12 डिसेंबर 2003 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालय शिरवळ,ता. खंडाळा,जि.सातारा येथे मी शिक्षक म्हणून रूजू झालो,आणि माझ्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक म्हणून आज माझी 21 वर्षे पूर्ण झाली. आजही मला माझा शाळेचा पहिला दिवस जसाच्या तसा आठवतो. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मला माझा प्रत्येक दिवस पहिलाच आणि नवीनच वाटतो. दररोज नवीन काहीतरी शिकावं आणि विद्यार्थ्यांना शिकवावं असं वाटतं. शिक्षक म्हणून घडविण्यात मला माझे आईवडील,आत्या- आणि मामा,माझे सर्व नातेवाईक आणि मला शिकवणारे सर्व शिक्षक,ज्या गुरूजन अध्यापक विद्यालय पाटण,जि. सातारा येथे मी शिक्षक म्हणून घडलो तेथील माझे सर्व गुरूजन,आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता मीच शिक्षक म्हणून घडत होतो.ते माझे आदर्श विद्यालय व साधना विद्यालय हडपसर येथील विद्यार्थी,आतापर्यंत मला लाभलेले माझे सर्व मुख्याध्यापक आणि सहकारी यांचा मी ऋणी आहे. तुमच्या सर्वांमुळेच मी शिक्षक म्हणून घडलो.
मागे वळून पाहताना मला आठवतो तो हजर व्हायला गेलेला पहिला दिवस. माझे वडिल सोबत होते. शिरवळचे आदर्श विद्यालय भोर संस्थानच्या ऐतिहासिक वाड्यात आहे.मुख्य प्रवेशद्वार बंद होते. आम्ही दिंडी दरवाजातून आत शिरलो. पहिल्या चौकातच ऑफिस व स्टाफरूम होते. दहावीची सराव परीक्षा चालू होती. त्याठिकाणी शिक्षक म्हणून पहिल्यांदा भेटले ते सुरेशराव कुदळे सर.जणूकाही त्यांनीच मला वाड्यात घेतलं. सर्व विचारपूस करून मला माहिती सांगितली. आजतागायत आमचा संपर्क आहे.अजूनही त्यांचे मला मार्गदर्शन मिळते.
आदर्श विद्यालयातील पहिले मुख्याध्यापक मला आठवतात. मा.रामचंद्र भोसले सर. साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी. मराठी त्यांचा विषय. कथाकथन उत्तम करायचे. सरांनी मला सर्वप्रथम बोलण्याची संधी दिली. आणि प्रोत्साहनही दिले. शिक्षणसेवक कालावधीत मला त्यांनीच अनेक प्रशिक्षणे करण्याची संधी दिली.शिक्षणसेवक असूनही अनेक वेळा मी Resourse person म्हणूनही काम केलं. सर दहावीच्या वर्गाला मराठी शिकवायचे. बऱ्याच वेळा संधी व अनुभव म्हणून ते मला त्यांच्या वर्गावरही पाठवायचे.
सुरूवातीला मला सहकारी मिळाले प्रसाद वालेकर सर,अनिल टेकाळे सर. त्यांनी मला त्यांच्याच खोलीत घेतलं. राहण्याचा प्रश्न मिटला. इतर सहकार्यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले. सुरूवातीच्या काळातील माझे सहकारी मित्र पर्यवेक्षक ननवरे सर,
दादासाहेब कुंभार सर,घाटगे सर ,माळी सर,मुल्ला सर ,संजय खरात सर, भापकर सर ,हिरवे सर, महेंद्र रणवरे सर,चंद्रशेखर माने सर, काळे सर,सुनील तांबेकर सर,बेंडकोळी सर,नेर्लेकर सर ,कुराडे सर,सौदागर सर,
पारठे मामा,देशमुख मामा,शिंदे मामा आणि शेलार मामा ,गणेश शेंगाळ सर
या सर्वांनी मला उत्तम मार्गदर्शन केले.
खरंतर मी तिथे शिक्षक म्हणून गेलो होतो. परंतु शिक्षक म्हणून कसं असावं हे मीच शिकत होतो. मला पहिल्याच दिवशी 6 वी क या वर्गाची क्लासटीचरशीफ मिळाली. माझ्या विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता शिक्षक म्हणून मीच घडत होतो. सामाजिकशास्त्र हा विषय मला शिकवायला मिळाला होतो.जो आजतागायत मी शिकवतो आहे.
त्यानंतर मला मुख्याध्यापक लाभले मधुकर जंत्रे सर.
सरांचा काळ माझ्यासाठी सुवर्णकाळच होता. अनेक गोष्टी त्यांच्याकाळात मी शिकलो आणि शिक्षक म्हणून मी घडलो.
त्यांनी माझ्याकडे 2006 मध्ये सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सोपवली.आणि कार्यक्रमांचे नियोजन,निवेदन कसं करावं,कार्यक्रम कसा पार पाडावा,हे मी शिकत गेलो.
सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच प्रार्थना व परीपाठ कसा घ्यावा ,शिट्टी कशी वाजवावी हे मला शारीरिक शिक्षण शिक्षक मुल्ला सर व पिसाळ सर यांनी शिकवले.
मला माझ्या विषयाचे सहकारी पवार सर,साळुंखे सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षिका घाडगे मॅडम,कदम मॅडम,त्याचबरोबर महिला सहकारी संपदा कांबळे मॅडम,सविता गोरे मॅडम,स्वाती शेरकर मॅडम, दिपाली चव्हाण मॅडम,नीता अडसरे मॅडम,गुंजवटे मॅडम,दीपा कुदळे मॅडम,माधुरी जाधव मॅडम,रूपाली गायकवाड मॅडम यांचेही उत्तम सहकार्य लाभले. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून लाभले जाधव सर व माने सर.
आदर्श विद्यालय व शिरवळ हे गाव माझी पहिली कर्मभूमी मी कधीच विसरू शकत नाही. आजही मला शिरवळमध्येच असल्यासारखं वाटतं. शिरवळ हे ऐतिहासिक व सांस्कृतिक व कलाप्रेमी गाव. छत्रपती शिवाजीमहाराज यांची स्वराज्य स्थापना कार्यातील पहिली लढाई याच गावात झाली. शिरवळमध्ये असणारा इतिहासाचा मूक साक्षीदार सुभाणमंगळ मला आजही खुणावतो. शिरवळ गावात अनेक सण - समारंभ,उत्सव इथे आनंदाने साजरे होतात. माझा सांस्कृतिक विकास होण्यात शिरवळचाही मोठा वाटा आहे.मी फक्त शाळेतील कार्यक्रमातच नव्हे तर गावातील सर्व कार्यक्रमात व उपक्रमात सहभागी व्हायचो.शिरवळमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. माझ्या विद्यार्थी मित्रांसोबत सुट्टीत ऐतिहासिक ठिकाणे पाहणे हा माझा छंद होता.
शिरवळमध्ये रामदास मोफत नगरवाचनालय आहे. या वाचनालयात तासनतास बसून मी वाचन करायचो. या वाचनालयातील ग्रंथपाल भरगुडे मामा व ईशवर शेळके मला अजूनही आठवतात. वाचनालयातील तुमचे खाते बंद करू नका असे मला भरगुडे काकांनी सांगितले. एका विद्यार्थ्यांकडे हे खाते मी सोपवले होते.
मी ज्या आळीत राहायचो ती पवार आळी अजूनही मला आठवते. या पवार आळीचा मी एक सदस्यच झालो होतो. समोरच ऐतिहासिक केदारेश्वर मंदिर व बारव आहे.नदीकाठी रामेश्वर मंदिर,
शिरवळमध्येच देशमुख वाडा,भैरवनाथ मंदिर,अनेक जुने वाडे,ऐतिहासिक मंदिरे आहेत.जवळच पांडवकालीन लेणी आहेत.शिरवळ जवळच मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारया क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ आहे. त्यां स्मारकात अनेक वेळा मला जाण्याची संधी मिळाली.अशा ऐतिहासिक वारसा जपलेल्या शिरवळ व परिसरातील गावामुळेच मला इतिहासाची आवड निर्माण झाली.
शिरवळहून साधना विद्यालयात माझी बदली 16 जून 2011 मध्ये झाली. साधनात येऊन मला 13 वर्षे पूर्ण झालीत. तरीही मी शिरवळ व आदर्श विद्यालय विसरलो नाही.व विसरूही शकत नाही. माझे शिरवळमधील विद्यार्थी व सहकारी यांनाही मी विसरू शकत नाही.आज 13 वर्षानंतरही जवळपास 70 ते 75% विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत.
शिरवळमधील सर्व ग्रामस्थ यांचेही मला बहुमोल सहकार्य लाभले.यात आदर्श विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य आप्पासाहेब देशमुख,शिरवळचे तत्कालीन सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,शिरवळ पंचक्रोशीतील सर्व शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ यांचाही उत्तम सहवास लाभला. या सर्वांचा मी ऋणी आहे.
साधनाचा प्रवासही माझा असाच अविस्मरणीय आहे. तो स्वतंत्रपणे पुढील काळात मी नक्कीच लिहिणार आहे.लेखनसीमा.
अनिल खूपच भावूक करणारे आणि शिरवळचे आणि वाड्यातील शाळेचे परिपूर्ण चित्रच डोळ्यापुढे उभे करणारे लेखन. २१ वर्षांच्या यशस्वी आणि आदर्श वाटचालीबद्दल खूप खुप अभिनंदन!
उत्तर द्याहटवाधन्यवाद विशाल
उत्तर द्याहटवा