पुस्तकांसाठी घर
माझ्या वाचकमित्रांनो!
जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी होतात...यशस्वी लोक वेगळं असं काही करत नाही,परंतु ते जे काही करतात तेच वेगळ्या प्रकारे करतात. हेच खरं यशाचं गमक आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण असतो.... असं विचारल्यावर आपल्यासमोर अनेक नावं येतात. परंतु फक्त संपत्ती म्हणजे श्रीमंती नाही. तर ज्याच्याजवळ बुद्धीचं धन आहे तोच खरा श्रीमंत होय.पुस्तकप्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत मनुष्य असतो. महापुरूषांचा जर आपण विचार केला तर ते जीवनात कमी व पुस्तकातच जास्त असतात. सदैव वाचन हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.
माणूस राहण्यासाठी घर बांधतो. परंतु पुस्तकांसाठी घर बांधणे ही गोष्टच आपल्याला वेगळी वाटते. अविश्वसनीय वाटते. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण व वेगळ्या पाहतो,अनुभवतो. 'जाॅर्ज पंपनच्या स्वागतासाठी भारतात- मुंबईत कोणीतरी 'गेट वे ऑफ इंडिया 'बांधले. शहाजहानने प्रिय पत्नी मुमताजमहल साठी 'जगप्रसिद्ध ताजमहाल' बांधला. अनेकांनी राजे- रजवाडे,शिशमहल बांधले. तर कोणी सुंदर मंदिरे बांधली. मुस्लिम शासकांनी मशिदी बांधल्या. परंतु पुस्तकांसाठी कोणी घर बांधले,घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं असं आपण ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल.परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवलं ते ज्ञानसूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते पुस्तकं का वाचायची?अभ्यास का करायचा? तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण स्वतः मानसिक व बौद्धिकदृष्ट्या पूर्णपणे समर्थ असणे आवश्यक असतं. आणि ज्ञानप्राप्तीसाठी आपलं स्वतःचं पुस्तकभांडार असणं आवश्यक असतं. पुस्तकांनी मन आणि मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त झालेलं मस्तक कोणापुढेही झुकत नाही.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नेहमीच सज्ज असतं. म्हणूनच पुस्तकं वाचणं महत्त्वाचं असतं.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधायचं ठरवलं. व 1930 नंतर त्यांनी मुंबईत 2 प्लाॅट विकत घेऊन दोन इमारती बांधल्या. एक पुस्तकांसाठी व एक राहण्यासाठी.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पुस्तकांसाठी बांधलेल्या घराचं राजगृह असं नाव ठेवलं. राजगृह हे जगातील सर्वात विस्तृत व खाजगी ग्रंथालय आहे. पुस्तकांसाठी घर बांधणं हे आंबेडकराचं स्वप्न सत्यात उतरलं होतं.अमेरिका,इंग्लंड,जर्मनी येथील जगप्रसिद्ध ग्रंथालयांची रचना अभ्यासून त्यांनी स्वतःचे पुस्तकांचे घर बांधले.
दादर येथील या राजगृह पुस्तकांच्या घरात अर्थात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात मराठी,इंग्रजी पुस्तकांबरोबरच गुजराथी,उर्दू,फ्रेंच,जर्मन,पारशी भाषेतील ग्रंथ होते. या राजगृह पुस्तकांच्या घरात बाबासाहेबांकडे सुमारे 50,000 हून अधिक ग्रंथ होते.जगातील सर्व दुर्मीळ ग्रंथ बाबासाहेबांच्या ग्रंथालयात होते. यात राजकारणावर आधारित 3000,इतिहास 2600,कायदा 5000,धर्मशास्त्र 2000,चरित्र 1200,अर्थशास्त्र 1000,तत्वज्ञान 6000,युद्धशास्त्र 3000,इतर 10,000 अशी अनेक दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या पुस्तकांच्या घरात होती.
भारतीय संविधान,बुद्ध अॅण्ड हिज धम्म,असे कित्येक ग्रंथ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या राजगृह या आपल्या पुस्तकांच्या घरातच लिहिली. राजगृह त्याचा साक्षीदार आहे.आजही राजगृह मुंबईत दिमाखात उभा राहून पुस्तक प्रेमींची वाट पाहतोय.
वाचन,अभ्यास,ग्रंथप्रेम यामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रगल्भ होत गेले. व्यक्तिमत्त्व घडत गेले. व ते ज्ञानसूर्य ठरले.
महापुरूषांचे चरित्र केवळ वाचायचे नसते. त्यांचं अनुकरणही करायचं असतं. विचार करा आपल्या संग्रही किती पुस्तकं व ग्रंथ आहेत. आपण पुस्तकांसाठी घर जरी बांधू शकलो नाही तरी आपल्या घरात पुस्तकांसाठी निश्चितच जागा देऊ शकतो. एखादा पुस्तकांचा कोपरा तयार करू शकतो. आपला पुस्तक संग्रह वाढवू शकतो. येईल का असं करता आपल्याला?
पाहा,वाचा व विचार करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा