माणूसकी.

 माझ्या वाचकमित्रांनो!

      "खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे ". मातृहदयी कवी साने गुरूजी सांगतात कोणालाही तुच्छ लेखू नये.कुणालाही हिणवू नये.आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रेम द्यावे आणि घ्यावे. जगात ज्यांना कोणीही नाही त्यांना आधार द्यावा. दु:खी ,कष्टी लोकांना समजून घ्यावे. त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करावा.

     या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते माणसाने ,माणसाशी ,माणसासारखे वागणे.माणूसकीने वागणे. ज्याच्याकडे माणुसकी आहे ती व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर व्यक्ती असते. माणूसकी हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे.माणूसकी म्हणजे नक्की काय?"माणूसकी म्हणजे "मी" माणूस व बाकीचेही " माणूस  " हे समजून वागणे होय.माणसाने माणसाला समजून घेतले तर जगातील सर्व समस्या दूर होतील.कोणताही भेदभाव राहणार नाही.जो इतरांशी प्रेमाने,मायेने आणि माणूसकीने वागतो त्याच्याच हदयात परमेश्वराचे वास्तव्य असते.

       परमेश्वर कुठे असतो. कवी कुसुमाग्रज " स्वातंत्र्यदेवीची विनवणी "या कवितेत म्हणतात,

"पन्नाशीची उमर गाठली, 

अभिवादन मज करू नका,

मीच विनवते हात जोडूनि,

वाट वाकडी धरू नका,

गोरगरिबा छळू नका,

पिंड फुकाचे गिळू नका,

गुणीजनांवर जळू नका,

माणूस म्हणजे पशू नसे,

हे ज्याच्या हदयात ठसे,

नर - नारायण  तोच असे ".

    म्हणजेच माणूसकी हाच परमेश्वर व मानवता हाच  धर्म आहे.

    फक्त स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करणे,एकमेकांना समजून घेणे हे माणूसकीचे लक्षण आहे.इतरांना त्रास न देणं हे मानवतेचं खरं लक्षण आहे. परंतु सध्याच्या काळात माणूस माणूसकी विसरत चालला आहे का ? माणूस हिंस्र होत आहे का? तर याचे उत्तर होय असेच आहे.आपल्या आजूबाजूला अशा काही घटना होत आहेत की,ते ऐकून,पाहून मन खिन्न होत आहे.पशूंनाही लाजवेल या थराला काही माणसं जात आहे.पशूही काही मर्यादा राखतात. त्यांची पशूता अजून टिकून आहे असंच वाटतं. आपण कधी ऐकले आहे का ? सिंहाने,सिंहाचीच शिकार केली,सिंहावरच हल्ला केला.सिंह शिकारीला निघतो,परंतु तोही बुद्धीने वागतो. तो इतर प्राण्यांवर हल्ला करतो,परंतु स्वतःच्या प्रजातीवर हल्ला करत नाही.तो जनावर आहे तरी त्याच्यात बुद्धी आहे.मनुष्याच्या बुद्धीला काय झाले आहे कुणास ठाऊक? सध्याच्या काळात माणूसच माणसाचा मोठा शत्रू झाला आहे. 

       थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात,

"मानसा - मानसा कधी व्हशील माणूस,

लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस,

मानसा- मानसा तुझी,नियत बेकार,

तुझ्याहून बरं गोठयातलं जनावर. ".

       माणूसकी म्हणजे कोणताही भेद न करता प्रत्येकाकडे माणूस या नजरेने बघणं.प्रत्येकाचा आदर,सन्मान करणं. आपण समोरच्याचा आदर केला तर समोरचाही आपला आदरच करेल. एखाद्याला छोटा सन्मान देणं,त्याचा आदर करणं ही फार मोठी गोष्ट ठरू शकते.

     अशीच एक छोटी घटना.एक बर्फाचा कारखाना होता. संध्याकाळची वेळ होती. कारखाना बंद होण्याची वेळ आली होती. सर्व कामगार घरी निघाले होते. शेवटी एक कामगार होता. तोही निघणार होता. तितक्यात कारखान्यात एक छोटासा तांत्रिक बिघाड होतो. त्या कामगाराला वाटते,आपण दुरूस्ती करून जावे. व त्यात बराच वेळ जातो. नंतर कारखान्याचे दरवाजे बंद होतात,लाईट बंद होते व कारखाना सील केला जातो. तो कामगार एकटाच आत अडकतो. विचार करा बर्फाचा कारखाना आहे. दरवाजे बंद,लाईट बंद अशा अवस्थेत थंडीने त्याचा मृत्यू होणार हे निश्चित होतं. तो पुरता घाबरून जातो. आणि अचानक आश्चर्यच घडतं. कारखान्याची लाईट चालू होते,तो जिथं आहे तिथला दरवाजा उघडला जातो. आणि तो समोर पाहतो तर हातात बॅटरी घेऊन त्या कारखान्याचा सुरक्षारक्षक उभा असतो. तो सुरक्षारक्षक त्याला बाहेर काढतो. फक्त कारखान्यातूनच नाही तर मृत्यूच्या दाढेतूनही.  नंतर तो कामगार त्या सुरक्षारक्षकाला विचारतो काका तुम्हांला कसं कळलं मी आत अडकलो आहे?.तेव्हा तो सुरक्षारक्षक म्हणाला "अहो कारखान्यात तुम्ही असे एकमेव आहात ,जे सकाळी कारखान्यात जाताना प्रवेशद्वारावर मला नमस्कार करता,माझ्याशी बोलता आणि संध्याकाळी घरी जाताना परत माझ्याशी बोलून घरी जाता. आज सकाळी तुम्ही माझ्याशी बोलून कारखान्यात गेला परंतु मला जाणवलं संध्याकाळी मात्र तुम्ही परत बाहेर गेला नाहीत.आणि म्हणूनच मी तुम्हांला शोधत कारखान्यात आलो ". 

       पाहिलंत एखाद्याला छोटा सन्मान देणं,एखाद्याशी स्वतःचं पद,पैसा व प्रतिष्ठा विसरून फक्त माणूस म्हणून पाहणं , वागणं किती महत्त्वाचं ठरू शकतं.?

         माणसाने ,माणसाला , माणसासारखं वागवणं म्हणजे माणूसकी. यात जात,पोटजात,धर्म,पंथ,भाषा,देश इत्यादी सर्व भेदभावांपलिकडे जाऊन फक्त माणूस म्हणून दुसऱ्याचा विचार करून त्याला/तिला सहानुभूतीपूर्वक जमेल तेवढी आणि जमेल ती मदत करणं म्हणजे माणूसकी होय. 

       चला तर मग आपण इतरांशी माणसासारखे वागूयात व माणूसकी जागवूया व टीकवूया...

    पाहा,वाचा,विचार करा आणि हो महत्त्वाचे कृतीही करूया.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर

राग व्यवस्थापन