जागरण
#मनभेद होऊ न देता प्रवृत्तीविरुद् लढा देणारे 'जागरण'
ज्येष्ठ लेखक भारत सातपुते यांचे 'जागरण' हे कादंबरीवजा आत्मचरित्र वाचताना अंगावर शहारे येतात...एक सामान्य जागरण करून उपजिविका करणाऱ्या गोंधळी समाजात ,शेतमजूर व पुढे शाळासेवक झालेल्या भऊ यांचा एक सामान्य मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य पदाला जाऊन पोहोचतो. स्वतःसाठी जगायचं ठरवलं असतं तर भारत सातपुते या लेखकाने,शिक्षक व आदर्श मुख्याध्यापकाने खोऱ्याने पैसा ओढला असता. परंतु स्वतःसाठी न जगता लेखक सदैव कुटूंबासाठी,समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी जगले. आयुष्यभर व्यसने,भ्रष्टाचार व काॅपी किंवा समाजातील वाईट प्रवृत्तीविरूदध लढले.अक्षरक्षः जागरण केलं.
घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी देवापुढे जागरण-गोंधळ घालतात. तसंच लेखक भारत सातपुते यांनी समाजाच्या सुख-समाधान व विकासासाठी सदमार्गाचं जागरण घातलं. स्वतःचा विचार न करता सतत समाजासाठी जगले. तेवत राहिले.जागरण करत राहिले. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं
' स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी जगलास तर खरा जगलास'.
सामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा शिकतो ? की पारंपरिक जागरण व्यवसायच करेल असं वाटत असताना शिक्षणप्रेमी आईवडीलांमुळे हा मुलगा शिकला व सुरूवातीला शासकीय प्रकाशन संचालनालय चर्नीरोड येथे क्लार्क नंतर शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, लेखक, कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, उत्तम माणूस असा जीवनाचा उत्कृष्ट टप्पा गाठला.
गातेगाव,जि.लातूर हे लेखकाचं जन्मगाव. घरी अठराविश्व दारिद्र्य,परंतु एकत्र कुटुंबपद्धतीत लेखकाचं बालपण गेलं.एवढं दारिद्र्य की दिवाळीत मागून आणलेल्या झोळ्यांवर लहान भावंडे तुटून पडायची. लेखक मिळून चार भाऊ व एक बहीण.आईवडील,आजोबा,चुलते, आत्या असा मोठा परिवार. हिश्श्याला पाच एकर कोरडवाहू जमीन त्यामुळे आई व भऊला मजुरीला जावं लागायचं. परंतु आईवडीलांना शिक्षणाचं प्रचंड प्रेम होतं. त्यामुळेच ही भावंडे शिकली. केवळ दुसरी शिकलेली आई व पाचवी शिकलेले भऊ शाळा व अभ्यासाची काळजी घ्यायचे. शाळा शिकावी यासाठी आई व भऊंनी या मुलांना कधीही जागरणाला जाऊ दिलं नाही. रूढ अर्थाने आईवडील फार शिकलेले नव्हते. परंतु ते जीवनाच्या शाळेत शिकले होते. शिक्षणाने माणूस घडतो यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.असे आईवडील मिळणं हे सुद्धा भाग्यच. श्रीमंत आईवडील असण्यापेक्षा संस्कार करणारे, उत्तम खाऊपिऊ घालणाऱ्या आईवडीलांपेक्षा भविष्याचा विचार करून कृती करणारे आईवडील केव्हाही श्रेष्ठ.
घरच्या गरीबीमुळे लेखक व त्यांच्या भावंडांनी लहानपणी सर्व प्रकारची कामे केली. परिस्थिती माणूस घडवत असते. परिस्थिती हा माणसाचा गुरूच असतो.1972 साली पडलेला भयंकर दुष्काळ. आणि या दुष्काळात शाळेत मिळणारी सुकडी हा एक जगण्याचा मार्ग होता याचे हदय पिळवटून टाकणारे वर्णन लेखकाने केले आहे.आईवडिल कळतनळत मुलांवर संस्कार करतात. याच दुष्काळाच्या वेळी सरकारी विहिरीसाठी अनुदान मिळायचे तेव्हा भऊंनी अगोदर मोठ्या भावाच्या शेतात विहीर घ्या असे सांगितले. भऊ पैशाने गरीब असतील परंतु मनाने श्रीमंत होते. आधी दुसऱ्याला द्यायचं आणि मग स्वतःला घ्यायचे हा लेखकावरील संस्कार कदाचित आईवडिलांच्या वागण्यामुळेच झाला असावा.
श्यामची आई कादंबरी आपल्यापैकी प्रत्येकानेच वाचली असणार. ती आई शामवर जशी संस्कार करायची तशीच प्रत्येक आई व वडील आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करतात. एकदा लेखकाने एका लग्नातून चपलेची चोरी केली होती.तेव्हा भऊ म्हणाले होते, 'डाकू होशील. जिथून आणली तिथे चप्पल ठेवून ये. प्रामाणिकपणा शिक. ' हे संस्कार लेखक आयुष्यभर विसरला नाही.लेखकाच्या जीवनात अनेक मोहाचे प्रसंग आले परंतु लेखकाने प्रामाणिकपणा सोडला नाही. एकदा मुलीला काॅलेज कामासाठी उत्पन्नाचा दाखला हवा होता. उत्पन्न लेखकाने जे-आहे ते दाखवले होते. ते स्वतः मुख्याध्यापक असल्याने त्यांना दहा हजार रुपये उत्पन्न कमी करून दाखला देण्याचं सह जमलं असतं, परंतु खोट्या मार्गाच्या ते बळी पडले नाहीत. आणि उत्पन्न कमी दाखवलं असतं तर फी चे 56000 रूपये वाचले असते. परंतु प्रामाणिकपणा शिक हे भऊंचे वाक्य कायम लेखकाच्या कानात जणूकाही घुमत होतं. 'ना खाऊंगा,और ना खाने दुंगा 'हे लेखकाचं ब्रीद होतं.
जातीयता,अस्पृश्यता याचे धडे लहानपणीच लेखकाला दररोजच्या जगण्यातून मिळत होते. घागर जर आडात पडली तर घागर काढायला दलित वस्तीतील रामलिंग चालायचा. त्याचा स्पर्श चालायचा. परंतु गावात दलितांसाठी वेगळा आड होता. हे असे का? असा प्रश्न लेखकाच्या मनात कायम घोळत होता. जातीयता माणसानेच निर्माण केली हे त्यांचं मन सांगत होतं.म्हणूनच डी. एड. करत असताना लातूरला खोलीचं भाडं कमी व्हावं म्हणून ते महारवाड्यातील पोरांसोबत राहायचे. आणि पुढील आयुष्यात लेखकाने कधीच जात-धर्म बघितला नाही. पाळला फक्त मानवधर्म.
जीवन आधी अनुभव देतं आणि मग शिकवतं...लेखकाने लहानपणी सायकल घेण्यासाठी दूध गोळा करून डेअरीला पोहोचण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. दूध जास्त जावं म्हणून दूधात पाणी मिसळण्याचा लेखकाला मोह व्हायचा. एके दिवशी घागरी घसरल्याने सर्व दूध खाली सांडले. त्यामुळे लेखकाला एक महिन्याचा पगार काटून द्यावा लागला व सायकल घेण्याचं स्वप्न हवेत विरून गेलं. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवता येत नाही याचे शिक्षण अनुभवाने दिले. पुढील जीवनात लेखकाने वाममार्ग कधीच पत्करला नाही.
डी. एड. नंतर लेखकाला मुंबई येथे क्लार्कची नोकरी लागली. परंतु दूरचे अंतर व खाण्याची आबाळ यामुळे लेखकाने मुंबई व नोकरी सोडली. पुढे 14 एप्रिल 1982 रोजी लेखकाला सध्याचा धाराशिव व तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील लातूर तालुक्यात भातांगळी येथे प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली.लेखकाने या शाळेत मनापासून काम सुरू केलं.शाळेतील गैरप्रकार त्यांना खपत नसत. विद्यार्थीहित जपलं. त्यानंतर हरंगुळ येथे बदली झाली. पुढे इतर काही शाळेत बदल्या होत गेल्या त्याची कारणमीमांशाही लेखकाने त्या त्यावेळी फार सविस्तर केली आहे ते मुळातच वाचनीय आहे.
लेखक शाळेचे मनापासून काम करून लेखन क्षेत्राकडे वळले. कविता,पुस्तके,दिवाळी अंकासाठी लेखन असे चौफेर लेखन चालू होते. सर्व क्षेत्रात राहून लेखकाचा पाय मोकळाच होता. नवनवीन क्षेत्र शोधतच होते. जणूकाही रंगात रंगूनीया रंग माझा वेगळा,गुंत्यात गुंतुनीही पाय माझा मोकळा... शिक्षक हा सर्जनशील असतो. एक शिक्षक काय-काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लेखक भारत सातपुते होय.अशीच एक कडू आठवणही लेखकाने सांगितली आहे.दिवाळी अंकाच्या लेखासाठी पहाटे लेखक उठून लेखन करत होते. दिवस होता 30 सप्टेंबर 1993 चा..लेखन चालू असतानाच पहाटे किल्लारी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात उद्भवलेली परिस्थिती व संकट काळात माणसांची वागण्याची मानसिकता हु अचूक शब्दात लेखकाने मांडली आहे.
प्रामाणिकपणा ,सत्यनिष्ठ वागणे यामुळे अनेकदा सहकारी शिक्षक,मुख्याध्यापक,अधिकारी यांच्याशी मतभेद व्हायचे. परंतु लेखकाने कोणाशीही मनभेद होऊ दिले नाहीत.काही माणसांना इतरांचा प्रामाणिकपणाही खुपतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात. परंतु त्यामुळेच गती वाढते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यावर नेहमीच सर्वांचा रोख असतो. यातूनच लेखक भारत सातपुते यांच्यावर एका शिक्षिकेने आरोप केले. अर्थात हे आरोप बिनबुडाचे होते. हे सिद्धही झालं. परंतु मनस्ताप हा होतोच. काही काळ समाजाचा व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हाही अनुभव लेखकाने घेतला.
कामाची आवड व तळमळ, नेतृत्वगुण यामुळेच लेखक भारत सातपुते यांना प्रौढ साक्षरता अभियान,सर्व शिक्षा अभियानांतर्गत काम करायला मिळाले. अनेकदा प्रौढ शिक्षा व सर्व शिक्षा अभियानांतर्गत लेखनाची संधीही मिळाली.
ऊसतोडणी कामगार स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेली वसतिगृह तपासणी हे कार्य कौतुकास्पद आहे.वसतिगृह तपासणीत पारदर्शकता ठेवल्यामुळे अनेक हितशत्रू तयार झाले. परंतु लेखकाने भ्रष्टाचाराशी कधीही हातमिळवणी केली नाही. आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शासनाचे अनेकदा पैसे वाचवले.
चांगल्या कामामुळे अधिकारी, राजकारणी व गावकरी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे अनेकदा बदलीचे प्रसंग आले.असंच खुलगापूर या शाळेशी असणारं नऊ वर्षाचं नातं तोडावं लागलं.
लेखक,कवी,शिक्षक,मुख्याध्यापक असूनही भारत सातपुते यांच्या पाचवीला नेहमी कर्ज पुजलेलं असायचं. कारण पगार कमी व गरजा त्यापेक्षा जास्त असायच्या. आईवडिल ,भावंडं व कुटुंबवत्सल माणसाला सर्वांच्याच गरजा पूर्ण कराव्या लागतात. कधीकधी यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होते.
उत्तम शैक्षणिक कार्य,उत्तम लेखन,तळमळ यामुळेच राजकारणी लोकांशी ओळख झाली.परंतु या ओळखीचा कधीही स्वतःच्या फायद्यासाठी लेखकाने उपयोग करून घेतला नाही.अगदी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख,दिलीपराव देशमुख,डाॅ. शिवाजीराव निलंगेकर पाटील,यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.
या नेत्यांच्या हस्ते अनेकदा स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन केले..डाॅ.शिवाजीराव निलंगेकर पाटील ज्या शाळेत शिकले त्या जिल्हापरिषद शाळेत भारत सातपुते यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या शाळेचा सर्वांगीण विकास केला.
शैक्षणिक कार्यातील काॅपीमुक्त अभियान हे एक महत्त्वाचे कार्य मुख्याध्यापक म्हणून भारत सातपुते यांनी केले. काॅपी करून माणूस फार पुढे जाऊच शकत नाही ही त्यांची भूमिका होती.वाईट गोष्टींना विरोध करणे हा लेखकाचा स्थायीभाव होता. 10 वी ,12 वी ,डी.एड. अशा अनेक ठिकाणी काॅपीमुक्त अभियानांतर्गत उत्तम काम करून शासनास मदत केली. शासनाने भारत सातपुते यांची काही ठिकाणी काॅपीमुक्त अभियानासाठी खास नेमणूक केली.
एका केंद्रावर एक वाक्य लिहिले होते.. ' यह केंद्र मौत का कुआ है,वहाॅ भारत सातपुते केंद्रसंचालक है!' या वाक्यावरून भारत सातपुते यांचे काम किती उत्तम होते याची पोहोचपावती मिळते.
उत्तम शैक्षणिक कार्य व निर्णयक्षमता यामुळे भारत सातपुते या धडाडीच्या शिक्षकास मुख्याध्यापक होण्याची संधी फार लवकर मिळाली. मुख्याध्यापक म्हणून शाळा मिळाली की त्या शाळेचा दसरा काढण्यात काही महिने जायचे. बिघडलेली घडी बसवणे हेच जणूकाही भारत सातपुते यांच काम झाले होते. जणूकाही समाजाची उत्तम घडी बसवणे,वाईट प्रवृत्तीविरूदध लढणे हेच भारत सातपुते यांचे जीवनकार्य होते. मुख्याध्यापक म्हणून भारत सातपुते यांना शेवटची शाळा मिळाली लातूर जिल्ह्य़ातील, औसा तालुक्यातील भादा या गावची शाळा. या शाळेचा मागील दसरा काढण्यात बरेच महिने गेले. हे एक बेरकी गाव होतं. इथे अनेक विक्षिप्त लोक व शिक्षक भेटले.परंतु शाळा समितीतील काही चांगल्या सदस्यांनी मुख्याध्यापक भारत सातपुते यांना खंबीर साथ दिली. आणि तेथील दोन्ही जिल्हापरिषद माध्यमिक शाळांचे काम पाहण्याची संधी मिळाली.लेखक व मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी या दोन्ही शाळांचा फार थोड्या वर्षांत संख्यात्मक व गुणात्मक कायापालट केला.
शाळेला जास्त वेळ देता यावा म्हणून ते गावातच खोली घेऊन राहिले. आणि जवळपास साडेचार वर्षे सरांनी सुट्टीविना शाळा हा स्वेच्छेने उपक्रम राबवला. या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. मला असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व शाळांना असे शिक्षक व मुख्याध्यापक मिळाले तर शैक्षणिक प्रक्रियेत अमुलाग्र बदल होतील. भादा येथील शाळेतील मुलांसाठी नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवले. अनेक शिक्षकांनी या उपक्रमास भरभरून पाठिंबा दिला.पहाटे मुलामुलींसाठी व्यायाम,पुस्तक वाचन,वर्तमानपत्र वाचन,दहावीचे जादा तास,साप्ताहिक चाचणी,परिपाठ,चावडीवाचन,स्नेहसंमेलन,शैक्षणिक सहली,शिक्षकांसाठी अभ्यास दौरा,मुलभूत ज्ञान चौकशी,दप्तराचे ओझे कमी करण्याचा उपक्रम,शाळा भौतिक व गुणवत्ता सुधार असे अनेक प्रकल्प मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी राबवले. या काळात शाळा हाच सरांचा संसार होता. शाळा,विद्यार्थी व गावाला त्यांनी संपूर्णपणे वाहून घेतले. आपली आई तंबाखूच्या व्यसनाने गेली ही सल त्यांच्या मनात कायम राहिली. त्यामुळेच भारत सातपुते हे स्वतः निर्व्यसनी राहिले.व आयुष्यभर व्यसने करू नका असा सल्ला देत राहिले. या गावातील तंबाखू खाणाऱ्या एका आज्जीबाईना त्यांनी व्यसनापासून परावृत्त केले.
आपल्या शैक्षणिक ,सामाजिक कार्यासाठी व साहित्यिक योगदानासाठी सरांनी कधीही पैसे भरून पुरस्कार घेतले नाही.अशा अनेक संधी त्यांनी लाथाडल्या. याव्यतिरिक्त सरांना अनेक खरेखुरे पुरस्कार मिळाले. प्रामाणिक कामाचे अनेक दुष्परिणामही सरांना भोगावे लागले. अनेक शिक्षक,अधिकाऱ्यांनी सरांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु सरांनी वाईट प्रवृत्तीविरूदधचं आपलं काम,जागरण कधीही सोडलं नाही.
सरते शेवटी सरांना शासकीय नियमानुसार 30 एप्रिल 2020 रोजी सेवानिवृत्त व्हावे लागले. कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व गावाच्या समोर सेवानिवृत्ती समारंभ होऊ शकला नाही ही खंत सरांच्या मनात कायमची राहिली. समाजाला सतत सर काहीतरी देतच राहिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर खोली सोडताना आपले साहित्य,भांडी गोरगरीब लोकांना वाटून टाकली व रिक्त मनाने परंतु समाधानी वृत्तीने सरांनी गाव व शाळा सोडली. आयुष्यभर सरांनी दिलेला लढा हा व्यक्तीविरुद्ध नव्हता तर प्रवृत्तीविरूदध होता.
चांगले काम केले तर चांगलेच फळ मिळते. दुसऱ्यांना फुले देताना आपल्याही हाताला सुगंध लागतो. असंच सरांच्या बाबतीत झालं. दुसऱ्यांसाठी काम करत असताना स्वतःला समाधान मिळालं, स्वतःची मुले उच्चशिक्षित होऊन नोकरीला लागली. राहण्यापुरतं घर बांधता आलं. सरांचं घर जरी लहान राहिलं तरी मन मोठं होतं. अनेक जीवाभावाची माणसं मिळाली. या सर्व गोष्टीत लेखक भारत सातपुते यांना आई व भऊ यांचे आशीर्वाद व सोशिक पत्नी सुषमावहिनी यांची खंबीर साथ मिळाली.
सर आता शैक्षणिक कार्यातून सेवानिवृत्त झाले. शासकीय नियमानुसार शिक्षक निवृत्त झाला तरी शिक्षकाचं कार्य कधीच थांबत नाही. शिक्षक समाजाला सतत मार्गदर्शन करतच राहतो. भविष्यात सरही असंच उत्तम मार्गदर्शन समाजाला करतील. सरांचं लेखनाचं कार्य तर अविरत चालूच राहणार आहे. अशा या लढवय्या मुख्याध्यापकास व समाजप्रबोधन करणाऱ्या लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
-- *अनिल वाव्हळ सर*
(*रयत शिक्षण संस्था - सातारा.*
*सहशिक्षक - साधना विद्यालय* *हडपसर,पुणे 28.* *पत्रकार ,पोलीसमित्र, समीक्षक*
*निवेदक - वक्ता - युट्यूबवर*
*ब्लाॅगर ,इतिहास अभ्यासक.*
मोबाईल नंबर - 8830251992 /9975381310)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा