राग व्यवस्थापन

       माझ्या वाचकमित्रांनो!

             राग येणं स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग कसा ? केव्हा ? व कुठे व्यक्त करावा याचं तंत्र माहिती असावं. रागाचं व्यवस्थापन करणं ज्याला जमतं त्यालाच जीवनात यश मिळतं.

      योग्य वेळी,योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी राग व्यक्त करणं यालाच राग व्यवस्थापन असं म्हणतात. राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता, त्या प्रसंगावर विचार करावा.परिस्थिती समजून घ्यावी. व आपला राग योग्य वेळी,योग्य शब्दांत किंवा न बोलता कृतीतून राग व्यक्त करावा. 

     पडणाऱ्या पावसाचं पाणी लगेच वाहून गेलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही.ते पाणी वाया जातं. परंतु पावसाचं पाणी अडवलं,साठवलं तर त्या पाण्याचा योग्य उपयोग करता येतो. ते पाणी वाया जात नाही. रागाचंही अगदी तसंच आहे.राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता साठवला,थोपवला आणि परिस्थितीनुरूप व्यक्त केला किंवा त्या रागाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर केलं तर राग हा देखील फलदायी ठरेल.

     वाहणाऱ्या वार-याला अडथळा आला नाही तर वारा प्रचंड वेगाने वाहतो.किंवा मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला उद्ध्वस्त करतो.परंतु त्या वार-याला अडथळा निर्माण केला,वारा अडवला तर त्याचे ऊर्जेत रूपांतर होते. आणि उद्ध्वस्त करणारा वारा अडवल्याने अनेकांचे जीवन बदलून टाकतो.

     रागाचे देखील सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करता येते. रागाचे तीव्र इच्छाशक्तीत रूपांतर करून स्वतःचे आणि अनेकांचे जीवन फुलवता येते. सामान्य व्यक्ती आलेला राग लगेच व्यक्त करतात. आदळ-आपट,चिडचीड करतात. व रागातील ऊर्जा वाया घालवतात.स्वतःला व इतरांनाही त्याचा त्रास होतो.परंतु असामान्य माणसं आलेला राग लगेच व्यक्त करत नाहीत. राग येण्याचं कारण ते समजून घेतात. समोरचा आपल्यावर का रागवला ? परिस्थिती व प्रसंग समजून घेतात. संपूर्ण परिस्थितीचं आकलन करून असामान्य लोक आपल्या रागाला बांध घालतात.राग थोपवतात.परिस्थिती बदलण्याचा विचार करतात. आणि आपला राग योग्य वेळी,योग्य शब्दांत किंवा बऱ्याच वेळा कृतीतून व्यक्त करतात.व त्यातून सकारात्मक गोष्टी निर्माण करतात.

      असामान्य माणसं रागानं गोंधळून जात नाहीत.रागाच्या वेळीही ते शांतपणे विचार करून कृती करतात. दूध नासलं तर सामान्य माणसं गोंधळून जातात. परंतु असामान्य माणसं त्या नासलेल्या दूधाचं पनीर करतात.आपल्यावर कोणी चिखलफेक केली,दगडधोंडे मारले तर असामान्य माणसं त्या चिखलगाळ व दगडधोंडयाचा वापर करून भरभक्कम घर बांधतात.

      रागाचं सकारात्मक ऊर्जेत व तीव्र इच्छाशक्तीत रूपांतर केलं तर स्वतःचा व समाजाचाही फायदा होतो. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील कोरेगाव येथे असतानाचा प्रसंग... घरी पाहुणे आले होते. भाऊराव,त्यांचे वडील पाहुण्यांसोबत जेवण करत होते. पाहुण्यांनी सहज विचारलं, तुमचा भाऊराव काय करतो? वडील म्हणाले,काही नाही दोन-वेळचे खातो व गावभर हिंडतो. लक्ष्मीबाई वाढत होत्या. भाऊरावांच्या ताटाजवळ आल्यावर वहिनींचे अश्रू अण्णांच्या ताटात ओघळले. भाऊरावांना वडिलांचा प्रचंड राग आला. परंतु ते वडिलांशी भांडत बसले नाहीत. त्यांनी वडील असं का म्हणाले हे समजून घेतले. परिस्थिती समजून घेतली व रागाचे तीव्र इच्छाशक्तीत रूपांतर केले. व ते थेट साताऱ्याला निघून गेले. पुढे जो इतिहास घडला तो आपल्या सर्वांना माहितीच आहे.

          महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत त्याच्याबरोबर चालले होते. तत्कालीन ब्राह्मणवृंदाने त्यांना "जोत्या आपली पायरी ओळखून चालावं "असं सांगून त्यांचा वरातीत अपमान करून त्यांना हाकलून दिलं. जोतीरावांना प्रचंड राग आला. परंतु ते त्या लोकांशी भांडले नाही,चिडले नाही. त्यांनी त्या परिस्थितीवर विचार केला. सामाजिक वास्तव समजून घेतलं. व स्पृश्य- अस्पृश्य भेदभाव दूर करण्याचं ठरवलं. रागाचं तीव्र इच्छाशक्तीत रूपांतर केलं. व रागाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करून परिस्थिती बदलली. लगेच राग व्यक्त केला असता तर पुढचा इतिहास घडलाच नसता.

     महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेत असताना त्यांना कृष्णवर्णीय म्हणून रेल्वेतून तिकीट असतानाही धक्के मारून बाहेर काढलं. गांधीजी त्या व्यक्तींशी भांडत बसले नाहीत. त्यांनी लगेच राग व्यक्त केला नाही.त्यांनी आपल्याबरोबर असं का घडले? ही परिस्थिती समजून घेतली. व काळे व गोरे भेद दूर करण्याचे ठरवले. त्यासाठी कार्य केलं. व इतिहास घडवला. 

         राग आल्यावर शांतपणे विचार करून परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आपल्या रागाला योग्य बांध घातला पाहिजे. राग लगेच व्यक्त न करता रागाचं सकारात्मक ऊर्जेत व तीव्र इच्छाशक्तीत रूपांतर करणे गरजेचे आहे. रागाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे.जो राग जिंकेल तो जग जिंकेल. 

    पाहा,वाचा,विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे कृतीही करा.

     शब्दांकन  - अनिल वाव्हळ...

      9975381310/8830251992

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर