वाचाल तर वाचाल
वाचाल तर वाचाल.
आपल्या सर्वांच्या कानीकपाळी सध्या एकच वाक्य कायम पडत असतं. ' अरे मुलांनो जरा वाचा रे ...
घरी आई-वडील आणि शाळेत शिक्षक सारखेच सांगतात. मुलांनो खूप वाचन करा ..पुस्तके वाचा कादंबरी वाचा, वर्तमानपत्र वाचा, गोष्टी वाचा, वाचत रहा .
मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो खरंच एवढं का वाचायचं? काय फायदा या वाचनाचा ? चला तर समजून घेऊया विषय चला वाचू आनंदे.
" दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे." समर्थ रामदास यांनी वरील शब्दात वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "वाचाल तर वाचाल ". तर फ्रान्सिस बेकन नावाचे इंग्रजी लेखक म्हणतात 'वाचन परिपूर्ण माणूस बनवते .वाचनामुळे उत्तम व्यक्तिमत्व घडते .वाचनामुळे माणूस सर्वज्ञानी होतो ,समृद्ध होतो. इतके सारे वाचनाचे महत्त्व आहे . एवढंच नाही तर पुस्तक प्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत असतो , असेही म्हणतात.
वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो. पुस्तके वाचल्याने जो आनंद मिळतो तसा आनंद इतर कोणत्याही गोष्टीतून मिळत नाही .वाचन माणसाला ज्ञानी व प्रगल्भ बनवते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावतात ,जीवन कसं जगावं हे वाचनच शिकवतं.
स्वर्गीय प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्या सर्वांना माहितीच आहेत. ते उत्तम वक्ते होते. ते म्हणायचे *वक्त्याचा, लेखकाचा रियाज म्हणजेच वाचन होय .* प्राचार्य शिवाजीराव भोसलेही प्रचंड वाचन करत असत .त्यावर त्यांची पत्नी नेहमीच त्यांना म्हणे तुम्ही सारखेच का वाचता हो ? ते फक्त हसत. एकदा शिवाजीराव भोसले यांना परदेशातून कार्यक्रमाचे बोलावणे आले .पती-पत्नी विमानाने निघाले होते .विमान आकाशात अगदी उंचावर आले .तेव्हा प्राचार्य आपल्या पत्नीला म्हणाले , मला सांग बरं आपण एवढ्या उंचीवर कसे काय आलो ? पत्नी म्हणाली विमानामुळे .तेव्हा प्राचार्य म्हणाले ,अग वेडे विमानामुळे तर आहोतच, परंतु मी जे काही खूप वाचन करतो त्यामुळे हे बोलावणे आले आहे .वाचनामुळेच मी या उंचीवर आहे .बघा मित्रांनो वाचनामुळे माणूस किती उंचीवर पोहोचू शकतो.
वाचनामुळेच आपल्या बुद्धीचा विकास होतो. वाचनामुळे सामान्य माणूस असामान्य बनू शकतो. वाचनामुळेच विचार परिपक्व होतात .शरीराची भूक अन्नाने भागते तशी मेंदूची भूक भागवण्यासाठी आपल्याला गरज असते ती वाचनाची. वाचनाने आपली कार्यक्षमता वाढते. जो खूप जास्त काळ वाचन करतो त्याचा बौद्धिक विकास होतो .महापुरुषांचा जर आपण विचार केला तर ते प्रचंड वाचन करत असत .क्रांतिकारक भगतसिंग यांना उद्या सकाळी फाशी होणार होती आणि अगोदरच्या रात्री ते वाचन करत होते. सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांनाही लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. थॉमस पेन यांचे ' द राईटस ऑफ मॅन' हे पुस्तक त्यांनी वाचले आणि त्यांनी पुढे इतिहास घडवला .स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे क्रांतिकारक, देशभक्त हे तुरुंगात गेल्यावरही चांगल्या- चांगल्या पुस्तकांचे वाचन करत .पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते तुरुंगातही उपोषण करत .महापुरुषांना देखील वाचनातूनच स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळेच महापुरुष जीवनात कमी आणि पुस्तकात म्हणजेच वाचनात जास्त असतात असंही म्हणतात.
वाचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते .पुस्तकांमध्ये उत्कृष्ट लेखकांचे अनुभव, विचार असतात. कविता वाचनातून कवीचे मत कळते .भाव विश्व उलगडते. ऐतिहासिक वाचनाने इतिहास कळतो .ज्या प्रकारचे वाचन करू तशी आपणास माहिती मिळते .
वाचनामुळे आपले विचार सकारात्मक होतात. जीवनाबद्दल कुतूहल निर्माण होते. वाचनाने आनंदाने जगण्याची आणि दुःखालाही तोंड देण्याची ऊर्जा मिळते.
वाचनामुळे मन एकाग्र होते. परंतु वाचन करण्यासाठी सुद्धा एकाग्रतेची गरज असते .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू इतके एकाग्र होऊन वाचायचे की ते स्वतःलाही विसरून जायचे. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचेही भान त्यांना उरत नसे .आपणही इतके एकाग्र होऊन वाचले पाहिजे तरच आपल्याला वाचनाचा आनंद मिळेल.
वाचन करताना मनाची एकाग्रता होणं खूप महत्त्वाचं असतं .एकदा तर लहानपणी भीमराव रस्त्यावरील दिव्याखाली वाचन करत होते. ते वाचनात एवढे तल्लीन झाले होते की , त्यांच्याजवळून लग्नाची संपूर्ण वरात गेली तरी भीमरावांच्या ते लक्षात आले नाही .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 - 18 तास वाचन करत. त्यामुळेच ते
ज्ञानसूर्य झाले. ते उत्तम वाचक म्हणून प्रसिद्ध होते. वाचनाच्या बळावरच ते राज्यघटना लिहू शकले .
वाचनाचे अनेक फायदे असतात. परंतु वाचन एकाग्रतेने करणे आवश्यक असते. नुसते वरवरचे वाचन काही उपयोगाचे नसते .व्यायामाने शरीराचा विकास होतो तसा वाचनाने बुद्धीचा , मनाचा विकास होतो .पुस्तके आपले खरे मित्र असतात. स्वतः कधीही बोलत नाहीत परंतु खूप काही बोलायला शिकवतात. सतत चांगलाच मार्ग दाखवतात .वाचनाने आपण अनुभव समृद्ध होतो. वाचनाने आपला आळस, निराशा, कंटाळा, एकटेपणा, अस्वस्थता, दूर होते.
बघा मित्रांनो वाचनाचे किती फायदे असतात .मग आपण सुद्धा खूप वाचन केले पाहिजे .
चला तर मग वाचू आनंदे.
वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत .ते म्हणतात पैशांपेक्षा मला पुस्तकातून जास्त आनंद मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एक वेळ माझी संपत्ती चोरीला गेली तरी चालेल ,पण माझी पुस्तके चोरणाऱ्यांचे हात मी कलम करेल. कारण वाचनानेच मला समृद्ध बनवले.
चला तर मग आपणही खूप वाचन करूयात आणि खूप ज्ञानी होऊयात.
अनिल वाव्हळ - 9975381310
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा