नातं
माझ्या वाचक मित्रांनो!
नातं किंवा नातेवाईक म्हटंल की ,आपल्या डोळ्यासमोर येतात आपले आईवडील,भाऊ-बहिण,पती-पत्नी,मुलं आणि इतर नातेवाईक. परंतु नातं फक्त रक्ताच्याच लोकांशी असतं का? तेच फक्त आपले नातेवाईक असतात का? नातं या शब्दाचा इतका संकुचित अर्थ आहे का? की आपण नातं या शब्दाची कक्षा कमी केली आहे??
खरंतर नातं हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे.नातं या शब्दात सारं विश्व व्यापलेलं आहे.नातं म्हणजे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,स्नेह,माया,ममता आणि बरंच काही.घट्ट बंधन आणि आणि ऋणानुबंध म्हणजे नातं होय.ज्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकीची आणि विश्वासाची जागा असते तो आपला नातेवाईक असतो. त्यांच्याशीच आपलं नातं निर्माण होऊ शकतं.ज्याच्या संकटात पुढे आणि आनंदात मागे उभं राहावसं वाटतं त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतं.
नातं हे कोणाशी ठरवून करता येत नाही.नातं कधी?कुठे?आणि केव्हा निर्माण होईल हेही सांगता येत नाही.परंतु एकदा नातं निर्माण झालं की ते आयुष्यभर टिकतं. खरं नातं शुल्लक कारणांवरून तुटू शकत नाही.नातं हे प्रसंगी फुलाहूनही कोमल परंतु वेळ आली तर वज्राहूनही कठोर असतं.
नातं म्हणजे मानसिक आधार. मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास म्हणजे नातं. सुखदुःखात सदैव सोबत म्हणजे नातं. नात्यात स्वार्थ नसतो आणि स्वार्थ असेल तर खरं नातं निर्माण होऊ शकत नाही.काही नाती जन्मापासून तयार होतात. तर काही नाती जन्मोजन्मीची असतात. काही नाती जीवन जगताना आपोआप निर्माण होतात. मनापर्यंत भिडतं आणि हदयात राहतं तेच खरं नातं. वडाच्या पारंब्या जशा मातीत घुसतात आणि मातीशी एकरूप होतात,तशीच खरी नाती मनापर्यंत भिडतात आणि एकजीव होतात.नातं हे पैशात मोजता येत नाही.परंतु नातं हे पैशाहूनही अनमोल असतं.
नातं हे दुहेरी असतं. दोघांच्याही मनात स्नेहाची भावना असेल तरच नातं जन्मं घेतं,फुलतं आणि टिकतही. नात्यात सहजता असावी लागते. नातं चूक झाली तर समजून घेणारं व समजून सांगणारं असतं.नात्यात रक्तापेक्षा मन जुळणं महत्त्वाचं.
अशीच एक कथा.....
एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा.एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला,"पोस्टमन ".....
आतून एका मुलीचा आवाज आला,"थांबा काका मी येतेय ".
दोन मिनिटे झाली,पाच मिनिटे झाली..
दार काही उघडेना.
शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला....
"कुणी आहे का घरात? पत्र द्यायचे आहे.
आतून मुलीचा आवाज आला,"काका दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते ".
पोस्टमन म्हणाला, "तसं चालणार नाही,रजिस्टर पत्र आहे सही करावी लागेल ".
पाच मिनिटे झाली पुन्हा शांतता.
आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले.
दारातली मुलगी पाहून पोस्टमन "शाॅक्ड"
दोन्ही पायांनी अपंग असलेली एक तरूण मुलगी दारात काठीच्या आधाराने उभी होती.काठीच्या आधाराने यायचं असल्याने तिला यायला वेळ लागला होता.
हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन सही घेऊन तो निघून गेला.
असेच अधूनमधून तिची पत्र यायची,मात्र आता पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर थांबायचा.
असेच दिवस जात होते.दिवाळी जवळ आलेली. तेव्हा त्या मुलीने एकदा पाहिले की,आज पोस्टमन अनवाणी पायानेच आला आहे.
ती काही बोलली नाही.मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या
पावलाचे ठसे उमटले होते. त्यावर एक कागद ठेवून तिने पायाचे माप घेतले.
नंतर काठी टेकत-टेकत ती गावातील चपलेच्या दुकानात गेली व तो मापाचा कागद देऊन तिने एक सुंदर चप्पलजोड खरेदी केला.
"रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त (म्हणजे बक्षिशी)
मागायली सुरुवात केली.
अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करत-करत तो त्या मुलीच्या घराजवळ आला.
हिच्याकडे काय बक्षिशी मागणार?बिचारी तर आधीच अपंगत्वाने दुःखी आहे.
पण आलोच आहोत तर तिला भेटून जावं असा विचार पोस्टमनने केला.व दाराबाहेर उभा राहून तिला आवाज दिला.
मुलीने दार उघडले.तिच्या हातात सुंदर पॅकींगचा बाॅक्स होता.
तो तिने पोस्टमनला दिला.आणि सांगितले ही माझ्याकडून बक्षिशी."पण घरी जाऊन बाॅक्स उघडा."
घरी येऊन त्याने बाॅक्स उघडला.त्यात सुंदर चपला व त्याही त्याच्या मापाच्या. हे पाहून त्याचे डोळे पाणावले.
दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून ऑफिसात त्याच्या साहेबांकडे गेला.आणि म्हणाला, " साहेब मला फंडातून कर्ज हवे आहे".
साहेब म्हणाले,"अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे.आता कशाला कर्ज हवं आहे?".
पोस्टमन म्हणाला,मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत.त्यासाठी कर्ज हवं आहे.
साहेब म्हणाले,"पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे.जयपूर फूट कोणासाठी?".
पोस्टमन म्हणाला,"साहेब जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही,ते एका परक्या व अपंग मुलीला उमजले आहे".
माझे अनवाणी पायाचे दुःख तिने कमी केले.तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना लाकडी पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवं आहे.
साहेबांसह सर्व स्टाफ नि:शब्द !!
सारेच गहिवरले.
महान लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची अनवाणी ही कथा या प्रसंगानुरूप मला सादर करावी वाटली.
नाती केवळ रक्ताची असून भागत नाहीत.
तर नात्याची भावना रक्तातच असावी लागते. ती ज्याच्या अंगी,भले तो तो आपल्या कुटुंबातील नसला तरी तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही.
पाहा,वाचा,विचार करा आणि सगळ्यात महत्वाचं असं सुंदर नातं तयार करण्याचा आणि असेल तर ते फुलवण्याचा प्रयत्न करा.
👌👌
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवा