एक भाकर तीन चुली...
पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळच आहेत की काय असाच क्षणभर भास होतो ही कादंबरी वाचताना...
भरउन्हात खळ्यावर जन्माला आलेली अभागी पारूबाई आणि रात्रीच्या काळोखात चिमणीचा उजेडही सोबतीला नसताना जन्माला आलेला बबू यांचा जीवनपट मनाला स्पर्शून जातो.आणि मनात घर करतो.
जन्म जिथे झाला ते खळं आणि आयुष्यभर कामं केलेली शेतं, नाला - बंडिगची कामं,ताली,रानं,यांनी पारूबाईची साथ कधी सोडलीच नाही. जीवनातील सर्व संकंट,रागराग,द्वेष,गरीबी,दुबळवाडी,
भाऊबंदकी,पुरूषांच्या वखवखलेल्या नजरा,सासू - नणंदाचा छळ सहन करूनही पारूबाई कधीही जीवनाला वैतागत नाहीत.
संकटांना पायाखाली घेऊन ,संकटाच्या छाताडावर उभं राहून पारूबाई स्वाभिमानानं जगतच राहातात. जीवनात हारत नाही. संकटांनी कधीही गर्भगळित होत नाहीत. ही कादंबरी वाचणारा वाचक जीवनातील संकटांना कधीच घाबरणार नाही. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार कधीही येणार नाही. स्वाभिमानाने
जीवन जगण्याची प्रत्येकात ओढ निर्माण होईन.
ही कादंबरी वाचताना मला पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आहेत असाच क्षणभर भास होतो. दोघींचाही जीवनप्रवास खडतर परंतु आशावादी आहे.
श्यामची आई ही साने गुरूजी यांची कादंबरी आपल्या प्रत्येकाने वाचली असेल. वेगवेगळ्या प्रसंगातून जशी श्यामवर संस्कार करणारी आई आहे अगदी तशीच छोट्या-छोटया प्रसंगातून बबूवर संस्कार करणारी आई येथे भेटते. जशी श्यामची आई त्याच तोडीची बबूची आईही भेटते.
बबूला न मारता,केवळ समजुतीच्या चार गोष्टीतून पारूबाई बबूवर संस्कार करतात. शाळेतल्या लव्हाराच्या नवनाथला बबूनं बेशुद्ध होईपर्यंत मारलं होतं. यावेळेस हीच आई बबूला सांगते.... "तुला असं बेशुद्ध होईपर्यंत कोणी मारलं तर मला कसं वाटेल.? यावर बबू म्हणतो यापुढं मी कोणालाही मारणार नाही....
दुसरा असाच प्रसंग बबूनं झिप्री शेळीला मारलं होतं. रक्तबंबाळ केलं होतं.यावर पारूबाई सांगतात "एकवेळ तू मला मार पण मुक्या जीवाला मारू नकोस..... साध्या प्रसंगातून भूतदया शिकवणारी आई...
तिसरा प्रसंग.... बबू एकदा सर्दी झाली म्हणून ओव्याचया बिड्या ओढतो. आणि गावभर बबूने बिड्या ओढल्याची आवई उठते. तेव्हा आई बबूला सांगते......"बबू तू सोन्याचा घास खा पण...उभ्या जन्मात कुठलंच येसन करू नकोस,आयुष्य उद्ध्वस्त होतं त्यानं."
पारूबाई या अक्षरनिरक्षर होत्या पण त्यांनी जगण्यावर पी.एच. डी. केली होती. बिनभिंतीच्या शाळेत शिकल्या होत्या. अनुभवाच्या जात्यात भरडून गेल्या होत्या. शेणाची पाटी व लिहिण्याची पाटी यामधील फरक त्यांना कळत नव्हता..परंतु त्यांचं शिक्षणावर खूप प्रेम होतं. त्या बबूला सांगायच्या "लई शिक आणि मोठा साहेब हो"
पावसाळ्यात सारं गर गळत असताना त्या बबूला सांगत " समदं भिजलं तरी चालंल पण तू तुहया वह्या- पुस्तकं भिजू देऊ नकोस ,
कारण आपल्या दुबळवाडीला हीच वह्या- पुस्तकं आणि शिक्षण बाहेर काढील ".
मोठमोठ्या विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ यांच्यापेक्षाही शिक्षणबद्दलचे हे सरस विचार पारूबाईंचे होते. नुसते विचारच नाही तर त्यांची कृतीही तशीच होती. गरीबीतीही त्यांनी उपिशीपोटी राहून बबूला शिकवलं व पुढील शिक्षणासाठी दोनशे मैल पाठवले. आजच्या आधुनिक काळात सगळ्या सुविधा असतानाही आपल्या मुलाला होस्टेलला पाठवताना कचरणारी आई पाहिल्यावर त्या काळात बबूच्या शिक्षणासाठी काळजावर दगड ठेवणारी पारूबाई श्रेष्ठ वाटते.
या कादंबरीतून लेखक देवा झिंजाड यांनी गरीबी,भाऊबंदकी,स्त्रियांचं दु:ख आणि कष्टमय जीवन,रूढी- परंपरा,पुरूषप्रधान संस्कृती,व्यसनांच्या आहारी गेल्याने वाया गेलेले संसार व माणसं यांचं चपखल चित्रण केलं आहे. कादंबरीतील प्रत्येक प्रसंग हा खिळवून ठेवतो. मनात घर करतो. नवीन आशावाद पेरतो. जीवन जगण्याची उर्मी देतो. कोणीही आपलं वाईट केलं तरी आपण नेहमी सगळ्यांचं चांगलंच चित्तायचं हा विचार देतो.आणि शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहायचं,लढत राहायचं.
कोणापुढेही हात पसरावयाचा नाही हेच शिकवतं.
कादंबरीचा अर्थ पहिल्यांदा लक्षात येत नाही. परंतु पुढे कादंबरी वाचताना अर्थ लक्षात येतो. कादंबरीतील चित्रण हे वास्तववादी आहे,रोजचं जगणंच आहे. परंतु ही कादंबरी वाचताना एखाद्या चित्रपटाची कथाच आपण वाचत आहोत असं वाटतं.
या कादंबरीत पारूबाई यांच्या जीवनाचा भोग मांडला आहे. त्यांची विविध रूपं,प्रत्येक वयोगटातील वेदना मांडल्या आहेत. पारूबाई यांच्या जीवनातील चांगल्या-वाईट माणसाविषयी व प्रसंगाविषयी चित्रण केलं आहे. एखाद्याच्या आयुष्यात किती संकंटं येतात त्यानं मन हेलावून जातं.
पारूबाई यांचे प्रेमळ आईवडील , बाळशीराम व तुळसा तत्कालीन रीतीरिवाज मोडून पारूबाई यांची दोन लग्न करून विधवाविवाहास प्रोत्साहन देतात व तिसऱ्या लग्नासाठी मूक संमती देतात. खरंतर विधवाविवाह त्याकाळात क्रांतीच होती. परंपरेला छेदच होता. पारूबाई यांना दहाव्या वर्षी आलेलं वैधव्य त्यांनंतर दुसरं लग्न व वीस वर्षाचा अर्धवट संसार व त्यानंतर तिसरं लग्न व काही सुखाचे दिवस या साऱ्या प्रसंगातून तावूनसुलाखून निघालेली पारूबाई ,तीन -तीन चुलीवर भाकरी भाजूनही आयुष्यभर भाजून निघालेली पारूबाई कधीच कडवट होत नाही. कोणाविषयी त्या कधीच वाईट विचार करत नाहीत. हेच त्यांचं वेगळेपण.पारूबाई यांच्या आयुष्यात चांगली आणि वाईट अशा दोन्हीही प्रकारची माणसं आली.
लेखकाने या कादंबरीतून ग्रामीण जीवन,ग्रामीण भाषा अत्यंत अभ्यासपूर्ण व अनुभवातून मांडली आहे. गरीबीमुळे बबूची परवड,हाल मांडले आहे. परिस्थितीने बबू कसा घडत होता. पडेल ती कामं करत होता. हौसमौज करण्याच्या वयात पोक्त माणसासारखा राबत होता याचंही चित्रण केलं आहे. गरीबीतही शिकून दरवर्षी बबूचा येणारा पहिला नंबर ही पारूबाई यांच्या जीवनातील आनंदाची बाब होती. गरीबी माणसाला न लाजवता किती काबाडकष्ट करायला लावते हेही उत्तम पद्धतीने मांडले आहे. बबूला वडिलांचा सहवास किती कमी लाभला आणि लहानपणीच बापाच्या चितेला बबूने दिलेला आगीनडाग व वावराच्या बांधावर लिंबाच्या झाडाखाली वडील म्हणजेच आप्पांच्या अस्थीशी बबूचा होणारा संवाद मन हेलावून टाकतो.
ही कादंबरी वाचताना ही कादंबरी फक्त पारूबाई व बबू यांची आहे असं न वाटता प्रत्येकाला आपलीच कादंबरी आहे, आपलेच जीवन त्यात मांडले आहे असे वाटते.
शाळेसाठी परगावी जाताना आईने बबूला दिलेला सल्ला...
"पोटात शिरून राहा,लई शिक,मोठा हो,
हे आईचे शब्द...शब्द नव्हे जीवनतत्वज्ञान कानात खोलवर जातात....
कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर जीवनभर असह्य वेदना सहन केलेल्या पारूबाई व बबूचं पुढील शिक्षण याचं काय झालं..पारूबाई यांची परवड संपून त्यांच्या जीवनात आनंदाचं झाड फुललं की नाही...पारूबाई यांचं पुढं काय झालं.........
याविषयी हुरहुर लागते...पुढे काय झालं असेल याचं उत्तर शोधण्यात मन रमतं....
चित्रपट पाहून थिएटरच्या बाहेर पडलो तरी चित्रपट मनातून जात नाही. तो मनात घोळत राहतो. त्याचा सिक्वेल यावं असं वाटतं...तसंच या कादंबरीबद्दल वाटतं..
लेखक देवा भाऊ आपल्या पुढील वाटचालीस व लेखनास शुभेच्छा. तुमच्या लेखनाला त्रिवार सलाम...🙏
पारूबाई व बबूचं पुढं काय झालं?
ही आमची उत्सुकता आपल्या पुढील कादंबरीतून पूर्ण व्हावी ही आशा मनी बाळगून लेखनास पूर्णविराम देतो.
अनिल वाव्हळ-सर
रयत शिक्षण संस्था - सातारा.
सहशिक्षक - साधना विद्यालय हडपसर,पुणे 28.
पत्रकार ,पोलीसमित्र
निवेदक - वक्ता - युट्यूबवर
ब्लाॅगर ,इतिहास अभ्यासक.
मोबाईल नंबर -
8830251992
9975381310
पुस्तकासाठी संपर्क
9890697098
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा