असे शिक्षक होणे नाही..
पाबळच्या ज्ञानपंढरीचे - पांडूरंग- दैवत.
ज्यांनी आम्हांला घडवलं त्या श्री. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या शाळेतील अनेक गुरूजनांपैकी एक असणारे ,आमच्या शाळेचे माजी प्राचार्य मा.गाडीलकर सर .
आदरणीय गाडीलकर सर आणि त्या काळातील आमच्या शाळेतील शिक्षक हे केवळ शाळेपुरते शिक्षक नव्हते, तर तेव्हाचे शिक्षक हे संपूर्ण गावाचे शिक्षक असायचे.गाडीलकर सर हे सुद्धा त्यातलेच एक. आमच्या श्री.भैरवनाथ विद्यामंदिर पाबळच्या ज्ञानपंढरीचे ते पांडूरंगच.
गाडीलकर सर हे आमच्या दोन पिढ्यांचे शिक्षक...माझ्या वडिलांना,आत्या व चुलते यांनाही ते शिकवायला होते. मी आणि माझ्या भावंडानाही ते शिकवायला होते. सरांच्या बाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे सरांचा दरारा आणि शिस्त. पाबळची संपूर्ण शाळा जर कोणाला घाबरत असेल तर ती गाडीलकर सरांनाच. गाडीलकर सर हे नाव उच्चारताच किंवा त्यांना लांबून पाहिले तरी पोटात भितीचा गोळा यायचा. इतके सर कडक शिस्तीचे होते. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांतही सरांचा दरारा होता. सर्व शिक्षकांनाही गाडीलकर सरांविषयी आदरयुक्त भिती होती.
साधारणपणे 1992-93 या वर्षी मी श्री. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या हायस्कूल मध्ये इयत्ता 5 वी ला प्रवेश घेतला. शाळा नवीन,सर्व शिक्षक नवीन आणि मराठी शाळेतून मोठ्या हायस्कूल मध्ये आलो याचीही अनामिक भिती होती. तेव्हा हायस्कूलचे प्राचार्य होते मा.हरीभाऊ थिगळे सर. शाळेत दोन थिगळे सर होते. एका कलाशिक्षक अजय थिगळे सर व दुसरे प्राचार्य थिगळे सर.त्यामुळे प्राचार्यांना सर्व शाळा मोठे थिगळे सर या नावाने ओळखायची. तेव्हा उपमुख्याध्यापक होते ढोकले सर.आणि शाळेचे पर्यवेक्षक होते गाडीलकर सर. हायस्कूल शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच गाडीलकर सरांचा दरारा आणि शिस्त आम्ही ऐकून होतो.हायस्कूलला गेल्यावर आम्हांला सरांचा दरारा आणि शिस्त प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी गाडीलकर सर यांच्याविषयी आम्हां पाचवीच्या मुलांमध्ये भिती निर्माण झाली. खरंतर सर आम्हांला पाचवीला शिकवायला नव्हते. अगदी ते 8 वी पर्यंतही आम्हांला शिकवायला नव्हते.तरीही भिती मात्र प्रचंड होती. कारण आम्हांला आमच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी सरांविषयी त्यांच्या शिस्तीविषयी सांगून आधीच जागृत केलं होतं.किंबहुना धोक्याची सूचना देऊन ठेवली होती. सरांपासून जपून राहायचं हे सांगितलं होतं. सरांच्या हातात कायम एक लाकडी रोलर म्हणजेच गोल जाड काठी असायची.
पहिल्याच दिवशी राष्ट्रगीत ,प्रतिज्ञा व प्रार्थना झाली.
या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता! या वीणावर दण्डमण्डीतकरा या श्वेतपदमासना!
ही प्रार्थना आजही आठवते.त्यानंतर सूचना देण्यासाठी पर्यवेक्षक गाडीलकर सर पुढे आले. आम्ही पाचवीची नवीन मुले. आम्हांला शाळेचे सर्व नियम सरांनी समजून सांगितले. शिस्त मोडली तर काय होईल हेही सांगितले. सरांचे रूबाबदार व्यक्तीमत्व,आवाजातील जरब,तीक्ष्ण व भेदक डोळे ,कडक आवाज यामुळे आम्ही पाचवीची मुलं अक्षरक्षः भेदरूनच गेलो. त्यांनंतर सरांनी खिशातून एक कागद बाहेर काढला. आणि नंबर वाचू लागले..10 वी अ ,10 वी ब व क या वर्गातील या -या मुलांनी स्टेजवर या...मुलं वर गेली तेव्हा कळालं ही 10 वीची मुलं सकाळी जादा तासाला गैरहजर होती. आणि मग गाडीलकर सरांनी त्या मुलांना शिक्षा करायला सुरूवात केली. सर त्या मुलांना चांगलीच शिक्षा करत होते. हातातला रोलर भरभर मुलांच्या हातावर फिरत होता. आणि त्याचा खट-खट असा आवाज येत होता. आणि मुलांचाही नको ना सर ,नको ना सर,परत असं नाही करणार ....असा आवाज येत होता. परंतु सर कोणाचंही ऐकत नव्हते. सगळी शाळा चिडीचूप झाली होती.त्यादिवशी सरांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.आणि शिस्तीत वागलं नाहीतर काय होतं हेही पाहायला मिळालं. त्या दिवशी ठरवलं आता इथून पुढे सरांपासून जपून राहायचं. शिस्त मोडायची नाही. आणि त्यादिवसापासून दररोज प्रार्थनेनंतर सकाळच्या जादा तासाला आणि रात्रीच्या स्टडीला नसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना व बेशिस्त वागणाऱ्या विद्यार्थ्यांना सर स्टेजवर घ्यायचे व शिक्षा करायचे.आणि मग कळाले गाडीलकर सरांना संपूर्ण शाळा का घाबरते ते.
सर पर्यवेक्षक होते. सरांचे दररोज तास चालू असताना वर्गासमोरून ,व्हरांड्यातून दोन-तीन राऊंड व्हायचे. आमची भली-मोठी,लांबलचक कौलारू इमारत होती.सरांचा राऊंड असला की सगळे वर्ग चिडीचूप असायचे. गाडीलकर सर वर्गाबाहेर आहेत याची प्रचंड भिती आम्हांला वाटायची. मधल्या सुट्टीत आम्ही सर्वजण जेवायला मैदानावर बसायचो.तेव्हाही सर मैदानावरून जात असतील तर मुलं शिस्तीत जेवायची. जुन्या ऑफिस नंतर शाळेचं ऑफिस पूर्वेकडील बाजूला भाऊसाहेब साकोरे हाॅलमध्ये गेलं. ऑफिस दुमजली होतं..खालच्या मजल्यावर कार्यालय व वरच्या मजल्यावर मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक कक्ष..सर वरच्या मजल्यावर गॅलरीत बऱ्याच वेळा उभे राहायचे..व तिथून संपूर्ण वर्गावर व मैदानावर कटाक्ष टाकायचे.सर जर त्या गॅलरीत उभे असतील तर एकाही मुलाची वर्ग सोडून मैदानातून जाण्याची हिमंत होत नव्हती. सर जास्त बोलत नसायचे परंतु सरांचं नुसतं अस्तित्व देखील शिस्तीला पुरेसं असायचं. गाडीलकर सर ज्या वरच्या मजल्यावर गॅलरीत उभे राहायचे,त्या गॅलरीचे नाव काही मुलांनी टकमक टोक असं पाडलं होतं... ते टकमक टोक असं नाव का पाडलं होतं हे आत्ता कळतंय.... वर्गाच्या बाहेर पडताना किंवा व मैदानावरून जाताना मुलं सर टकमक टोकावर तर नाही ना हे अगोदर पाहायचे. नसतील तरच पुढे जायचे...
गाडीलकर सर आणि शिस्त हे समीकरण होतं..सरांचं व्यक्तीमत्व हे आकर्षक होतं. सर इंग्रजी विषय शिकवायचे. शक्यतो नववी ते बारावी हे वर्ग त्यांच्याकडे असायचे.सरांचा इंग्रजी विषयाचा गाडा अभ्यास होता. इंग्रजीवर प्रभुत्व होतं. आम्हांला नववी ते बारावी वर्गांना सरांनी इंग्रजी शिकवलं. दहावीनंतर कळायला लागलं सर जसे कडक आहेत तसेच प्रेमळही आहेत..नारळासारखे वरून कडक परंतु आतून गोड. सरांनी केवळ इंग्रजी विषय कधीच शिकवला नाही. सर केवळ पुस्तकी शिक्षण देणारे शिक्षक नव्हते. तर सर त्याकाळात व्यक्तीमत्व विकास,जीवनशिक्षण,मूल्यशिक्षण,नैतिक शिक्षण,जीवन कसं जगावं,स्पर्धा परीक्षा याबाबतही मार्गदर्शन करायचे....सरांना सर्व विषयाचं व जीवनाचं उत्तम ज्ञान होतं. गाडीलकर सर हे आई व वडील आणि शिक्षक अशा तीनही भूमिका उत्तम निभावत असत. त्याकाळात गावातील लोकही सरांचं मार्गदर्शन घ्यायचे. गावाला देखील सर प्रिय असायचे. गावातही सरांचा आदरपूर्वक दरारा होता.कारण सरांचं व्यक्तीमत्वच तसं होतं. गावातील लोकही सरांचं मार्गदर्शन घेत. गावातून जातानाही प्रत्येक माणूस सरांचा सन्मान करायचा.इंग्रजी पत्रव्यवहार किंवा इतर बाबी सर गावालाही समजून सांगत.सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी गावातून जाताना सर समोर दिसले तरी आम्ही मुलं रस्ता बदलून जायचो.
ज्युनियर कॉलेज सकाळी भरायचं व माध्यमिक शाळा दुपारी. सर मात्र सकाळ पासून संध्याकाळपर्यंत शाळेतच असायचे. जणूकाही शाळेसाठी त्यांनी स्वतःला वाहूनच घेतलं होतं.
शाळा सुटल्यावर सर आणि इतर शिक्षक दररोज न चुकता फिरायला जायचे. सरांना आम्ही कधीही बाहेर चहा पिताना किंवा हॉटेलमध्ये काही खाताना कधीच पाहायले नाही. आरोग्यविषयक सर खूपच जागृत होते.शिस्त ,नैतिकता,मूल्यशिक्षण व्यक्तीमत्व या सरांच्या जमेच्या बाजू होत्या.
मी आठवी- नववीला गेलो तेव्हा सर शाळेचे उपमुख्याध्यापक झाले. आणि पुढे शाळेचे प्राचार्यही झाले.बारावीला सर मला इंग्रजी शिकवायला होते. आज सरांना सेवानिवृत्त होऊन 17 हून अधिक वर्ष होऊन गेली. परंतु आजही सारं गाव आणि विद्यार्थी यांना सर शाळेतच आहे असंच वाटतं.... इतके ते शाळेशी समरस झाले होते. पाबळची शाळा सरांच्या नावानेच ओळखली जायची. सरांनी आता 75 वर्षे पार केले. परंतु अजूनही सर तितकेच कडक व शिस्तप्रिय आहेत.अजूनही कोणीही भेटलं तरी त्यांना लवून नमस्कार करतात.सरही प्रत्येकाला आजही नावानिशी ओळखतात. आजही आम्ही विद्यार्थी आणि गाव सरांच्या संपर्कात आहोत. जमेची बाजू म्हणजे गाडीलकर सरांचा चिरंजीव विशाल आणि आम्ही पहिले ते दहावी वर्गमित्र होतो.त्यामुळेच विशालच्या माध्यमातून आम्हांला सरांची खाली-खुशाली वरचेवर कळतेच.
खरोखरच गाडीलकर सर हे आमच्या पाबळच्या ज्ञानपंढरीचे पांडूरंग, आमचे विठ्ठलच आहेत.
सरांचे आरोग्य आजही उत्तम आहे. सरांना यापुढेही उत्तम आरोग्य,धनसंपदा लाभावी. सरांनी शतायुषी व्हावे या सदिच्छा...
सरांचा एक विद्यार्थी.
अनिल संभाजी वाव्हळ. -
8830251992 / 9975381310
शिक्षक - साधना विद्यालय हडपसर
रयत शिक्षण संस्था,सातारा.
पत्रकार,पोलीसमित्र , वक्ता
ब्लाॅगर, निवेदक,
यूट्यूबर, इतिहास अभ्यासक.
अत्यंत सुंदर आणि त्या गतकाळात नेऊन सोडणारं ओघवतं लिखाण
उत्तर द्याहटवाधन्यवाद विशाल
उत्तर द्याहटवा