चूक नव्हे,शिक्षण..

        माझ्या वाचकमित्रांनो!

     " चुका आणि शिका " ही अनुभवपद्धती आपण नेहमीच ऐकतो. चुका होत नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही.चुका या काम करणार-यांकडूनच होतात. काही माणसं चुकांकडे दुर्लक्ष करतात.तर काही माणसं चुकांमधून शिकतात. चुकतो तो माणूस. आणि चुकांमधून शिकतो तो शहाणा माणूस.

        चूक करणं हा मानवी गुणधर्म आहे.आणि झालेली चूक सुधारणे हे चांगला माणूस असण्याचं लक्षण आहे.झालेली चूक मान्य केली किंवा स्वीकारली की ती सुधारता येते.परंतु काही माणसं चुका स्वीकारत नाहीत. मी चुकू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीत. किंवा काहींना चुका स्वीकारण्याचा कमीपणा वाटतो. आणि अशी माणसं कधीही सुधारू शकत नाहीत. म्हणून चूक झाली तर मोठ्या मनाने चूक मान्य करा व सुधारणा करा. 

     बरेच जण चूक होऊ नये म्हणून कोणतंही काम करत नाहीत. काम टाळतात. आणि त्यामुळे चुकाच होत नाही. परंतु काम न करणाऱ्या माणसांना कोणताही अनुभव येत नाही. ते निष्क्रिय राहतात. याउलट काम करणारी माणसं चुकतात आणि अनुभवाने शहाणी होतात. चुकांमधून सुधारणा करतात. व परिपूर्ण होतात.व काम न करणारा मनुष्य तसाच निष्क्रीय राहतो. 

       जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थाॅमस अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला हे आपल्या सर्वांना माहिती आहे.परंतु त्यासाठी त्यांना हजार वेळा प्रयोग करावे लागले.प्रत्येक वेळेस त्यांच्या लहान-लहान चुका होत होत्या. परंतु त्यांनी लहान चुकांकडेही दुर्लक्ष केले नाही. प्रत्येक चूकीतून शिकत गेले.सुधारणा करत गेले. आणि शेवटी 1001 वा प्रयोग यशस्वी झाला .बल्बचा शोध लागला व जग प्रकाशमय झाले. चुका होतात म्हणून थाॅमस अल्वा एडिसन यांनी प्रयोग करणे बंद केले असते तर पुढचे शोध लागलेच नसते. चुका म्हणजे शिक्षणच असते.

       चुकला तो थांबला असं कधीच होत नाही. तर जो धडपड करत नाही तो थांबतो. चुकांची दुरूस्ती करतो तो शिकतो आणि यशापर्यंत पोहोचतो.

    चूका सर्वांकडून होतात. कधी चूक लहान असते.तर कधी चूक मोठी असते. परंतु चूक ही चूकच असते. लहान चूक सुद्धा महागात पडू शकते. त्यामुळे चूक लहान की मोठी असा विचार न करता चूक सुधारण्याकडे लक्ष द्यावे. वेळीच चुक सुधारली की पुढचा अनर्थ टळतो. वेळीच एक टाका घातला की पुढचे नऊ टाके वाचतात.

       चूक लहान म्हणून दुर्लक्ष केले की तिचे रूपांतर मोठ्या चुकीत होऊ शकते. 

    अशीच एक कथा......

       कलींग देशाचा एक राजा होता. या राजाला मध खायला प्रचंड आवडायचे. त्याच्यासोबत नेहमी मधाचा प्याला असायचा. दरबारात असेल किंवा राज्यात फिरत असेल तरी मधाचा प्याला घेऊन एक सेवक त्याच्यासोबत असायचा. 

        एके दिवशी हा राजा आपल्या राज्यात नगरप्रदक्षिणा करत होता. सोबत मंत्रिमंडळ व सैन्य होतं. आणि राजासोबत त्याचा सेवक मधाचा प्याला घेऊन हजर होताच. राजा मध चाखत-चाखत पुढे चालला होता. एकदा अचानक त्याचा सेवकाला धक्का लागला. आणि मधाच्या प्याल्यातून दोन थेंब खाली सांडले. राजाच्या मनात आले.... दोनच थेंब सांडलेत मधाचे ,त्यात काय एवढे? तो दुर्लक्ष करून पुढे गेला... 

            दुपारनंतर त्याला बातमी समजली की आपल्या राज्यात दंगल झाली आहे. राजाने  प्रधानांना दंगलीचे कारण शोधायला सांगितले. प्रधानाने एक दिवस सर्व चौकशी केली व राजाला सांगितले. राज्यात जी दंगल झाली ती तुमच्यामुळेच झाली... 

       राजा म्हणाला माझ्यामुळे दंगल कशी होऊ शकते?

प्रधान म्हणाला,काल तुम्ही जाताना मध खात-खात पुढे जात होता. तुमचा सेवकाला धक्का लागून मधाचे दोन थेंब खाली सांडले. त्यामुळेच दंगल झाली. 

        राजाला काही कळेना. तो म्हणाला एवढ्याशा चुकीने काय होऊ शकतं? 

   तेव्हा प्रधान सांगू लागला....

           तुमच्या हातून रस्त्यावर मधाचे दोन थेंब सांडले. तुम्ही दुर्लक्ष करून पुढे गेलात...

त्यानंतर रस्त्यावर मध वेचण्यासाठी मुंग्या जमा झाल्या. रस्त्यावर असंख्य मुंग्या पाहून  तिथे मुंग्या खाण्यासाठी एक पाल आली. पाल मुंग्या खाऊ लागली. रस्त्याच्या कडेने एक मांजर चालली होती. त्या मांजरीने पाल पाहिली .व पाल खाण्यासाठी रस्त्याच्या कडेला मांजर दबा धरून बसली.. जवळून चाललेल्या कुत्र्याने पाहिले,समोर एक मांजर बेसावध आहे. आपण मांजरीची शिकार करूयात. तेव्हा तिथे विरूद्ध बाजूला अजून एक कुत्रा आला.त्यानेही तसाच विचार केला. व दोघांनीही मांजरीवर एकाच वेळी झेप घेतली. 

        कुत्र्यांना पाहून मांजर पळून गेली. दोन्ही कुत्री एकमेकांवर भुंकू लागली. एकमेकांच्या अंगावर आली. व त्यांचे भांडण सुरू झाले. कुत्र्यांचा आवाज ऐकून त्या दोन्ही कुत्र्यांचे मालक तिथे आले.व ते कुत्र्यांचे भांडण सोडवू लागले.एकमेकांच्या कुत्र्यांना हाकलवू लागले.असं करता करता कुत्र्यांचे भांडण सुटले व त्या दोन माणसांचे भांडण सुरू झाले. ते एकमेकांवर ओरडू लागले. व शेवटी हाणामारी सुरू झाली.    

       आता त्या दोन्ही माणसांचे कुटुंबीय व नातेवाईक भांडण सोडवायला आले..... आणि भांडण सोडवता- सोडवता दोन गटात हाणामारी सुरू झाली. दोन गट एकमेकांवर भिडले.... हे पाहून नगरातील लोक दोन्ही गटात सहभागी झाले.तुंबळ हाणामारी सुरू झाली.. त्याचेच रूपांतर दंगलीत झाले.लोकांनी जाळपोळ सुरू केली...

        प्रधान म्हणाला, बघा राजन तुमच्या छोट्याशा चुकीमुळे केवढा अनर्थ घडला. आणि मग राजाच्या लक्षात आले चूक ही चूकच असते. त्यात लहान- मोठं असं काहीही नसतं... चूक वेळीच दुरूस्त केली पाहिजे याचं राजाला शिक्षणही मिळालं.

           चुका सुधारण्याची सर्वांना संधी मिळते. परंतु काही लोक चुका मान्य करत नाहीत. किंवा चुकांकडे लक्ष देत नाहीत. आणि मग चुकांचं रूपांतर मोठ्या चुकांमध्ये होऊन अधोगतीला सुरूवात होते.चुका सुधारणे हे समजूतदारपणाचे लक्षण आहे.चुका नव्हे तर शिक्षण या सकारात्मक भूमिकेतून चुकांकडे पाहायला हवं. तर सुधारणेला वाव मिळेल. 

         पाहा, वाचा,विचार करा...आणि सगळ्यात महत्त्वाचे चूक झालीच तर ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करा.

   

 लेखन  - अनिल वाव्हळ 

        9975381310/8830251992

      Anilwavhal9@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्वालिटी टाईम.

पुस्तकांसाठी घर

राग व्यवस्थापन