सकारात्मक विचार..
माझ्या वाचक मित्रांनो!
ज्याप्रमाणे अस्वच्छ परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या शरीरावर परीणाम होतो. आपण आजारी पडतो, आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपण मनाने व विचाराने आजारी पडू शकतो. आजारी पडू नये म्हणून आपण स्वच्छ वातावरणात राहण्याचा व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो.तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार व सभोवताली सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते.
जीवनात सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण सकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या गोष्टीही चांगल्या घडतात. आपण जर नकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या घटनाही वाईटच असतात.सकारात्मक विचार आपला जीवनदृष्टीकोन बदलतो.सकारात्मक विचार ही एक मानसिक व भावनिक वृत्ती आहे.सकारात्मक विचारांमुळे अनुकूल बदल घडतात सकारात्मक विचार केल्यामुळे आपले नैराश्य दूर होते व आपण प्रयत्न करण्यास तयार होतो,अशा विचारांमुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते.आपण जर सकारात्मक विचार केला तर ती गोष्ट करण्याचा विचार येतो व आपण त्यादृष्टीने प्रयत्न करतो. येणाऱ्या अडचणींवर आपण विचार करतो. व त्या ध्येयापर्यंत आपण निश्चितच पोहोचतो.सकारात्मक विचारांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. व आपल्या आजूबाजूचे लोकही तसाच विचार करतात. त्यांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळेच जीवनात सकारात्मक विचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज हे नेहमी सकारात्मक विचार करायचे.आणि सकारात्मक विचारांनाच नेहमी प्रयत्नांची व सहकाऱ्यांची जोड मिळते. शिवरायांनी सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर केली. छत्रपती शिवाजीमहाराज आग्रा या ठिकाणी औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. 5000 सैनिक व तोफांचा खडा पहारा होता. साक्षात यम बनून पोलादखान शिवाजीमहाराजांवर नजर ठेऊन होता. परंतु त्या अवघड परिस्थितीतही शिवरायांनी सकारात्मक विचार केला,"या आग्र्याच्या कैदेतूनही मी माझ्या सहकाऱ्यांसह बाहेर पडणारच " मला कोणीही रोखू शकत नाही. मला बाहेर पडून स्वराज्य वाढवायचं आहे. इथे अडकून चालणार नाही.
या सकारात्मक विचारांमधून शिवरायांचे बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू झाले.शिवरायांच्या या सकारात्मक विचारांमुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांच्यातही आत्मविश्वास निर्माण झाला. व सर्व आवश्यक ते प्रयत्न करून महाराज आपल्या सर्व सहकाऱ्यांसह राजगडावर येऊन सुखरूप पोहोचले. विचार करा या जीवघेण्या प्रसंगात शिवरायांनी सकारात्मक विचार केला नसता तर पुढे काय घडले असते?
संकटाच्या काळीही जर माणसाने सकारात्मक विचार केला तर त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. तसे प्रयत्न सुरू होतात. व माणसाचे अवसान गळण्यापेक्षा माणूस त्यातून बाहेर पडतो.वाईट परिस्थितीही माणसानं सकारात्मक राहावं. स्वतःच्या मनाला सांगावं ही वाईट वेळ ,परिस्थिती तात्पुरती आहे.आपण ती बदलू शकतो. संकटं काही कायमची नाहीत.
दिवसाची सुरूवात सकारात्मक विचाराने करा. सकाळी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःलाच सांगा...आजचा माझा दिवस चांगला असेल.येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी सामोरा जाईन. येणारी संकटं मला घाबरवण्यासाठी नाहीत तर माझी परीक्षा पाहण्यासाठी येत आहेत.
"असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर ".
सकारात्मक विचारामुळे ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आणि आपण ध्येयापर्यंत पोहचू शकतो.
सकारात्मक राहणं जीवनात खूप महत्त्वाचं असतं.सकारात्मक विचारांनी,सकारात्मक राहण्याने शारीरिक आजार बरे होतातच असे नाही. परंतु सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण ताणतणावाच्या वेळीही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो.व वाईट
प्रसंगातूनही बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो.उदा.कर्करोग अर्थात कॅन्सर किंवा कोणत्याही असाध्य रोगाचे निदान झाले तर कोणाच्याही मनावर व विचारांवर त्याचा आघात होऊ शकतो. तो माणूस खचू शकतो. परंतु त्या रुग्णाने वाईट वाटून घेण्यापेक्षा आता निदान झालेलेच आहे त्यात आपण बदल करू शकत नाही ही सत्य परिस्थिती स्वीकारली आणि आता या कर्करोगावर मात कशी करायची याचा विचार केला तर त्याला काहीतरी मार्ग सापडू शकतो.व तो रूग्ण कर्करोगावरील उपचारावर लक्ष केंद्रित करून कर्करोगावर मात करू शकतो.सकारात्मक विचार करणारे व आशावादी लोक रोगावरही मात करू शकतात.
परंतु एखादा आजार जडल्यावर "आता माझे काही खरे नाही "यातून मी बाहेर पडेल का?मी बरा होणारच नाही ,असा नकारात्मक विचार केला तर तो रूग्ण लवकरच दगावेल.सकारात्मक विचारांनी कित्येक लोकांनी असाध्य आजारांवर मात केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सकारात्मक राहण्यासाठी आपण स्वतःशी सकारात्मक स्व:संवाद साधला पाहिजे.हे कशाला करायचे?आणि त्याचा काय उपयोग? हे कामच अवघड आहे ... असा विचार करण्यापेक्षा ,'हे काहीतरी नवीन शिकण्याची मला संधी आहे असा विचार करणे आवश्यक आहे. आपण काम करतो त्याठिकाणी आपल्याला एखादे काम सांगितले तर 'मलाच का?मीच दिसलो का? मला खूप काम असते,माझ्यावर नेहमीच अन्याय होतो ,असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा माझ्यावर वरिष्ठांचा विश्वास आहे, किंवा मी हे काम करण्यास योग्य आहे, मला नवीन अनुभव मिळेल असा सकारात्मक विचार केला तर कामाचा आनंद मिळेल.... नाहीतर जीवनाचं रडगाणं चालूच राहील.नकारात्मक स्वविचारांना बदला व सकारात्मक स्वविचार तयार करा.
आपण जसा विचार करू तसंच घडतं.
अशीच एक कथा....
गणेश नावाचा मुलगा जंगलातून प्रवास करत होता. घनदाट जंगल,झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या,वारयाचं व पक्ष्याचं संगीत आजूबाजूला होतं. दुपारची वेळ झाली. गणेशला थकवा आला होता. त्याने एक डेरेदार झाड पाहिलं व तिथे विश्रांतीला थांबला.
झाडाखाली सावलीत बसल्यावर त्याच्या मनात विचार आला मला जर या जंगलात सुग्रास भोजन मिळालं तर...आणि काय आश्चर्य त्याच्यापुढे पंचपक्वान्न आलं. तो मनसोक्त जेवला. जेवल्यावर त्याला झोप येऊ लागली. त्याने विचार केला मला पलंग मिळाला असता तर.... आणि काय आश्चर्य डोक्यावर पलंग घेऊन पलंग विक्री करणारा माणूस तिथे आला व तोही तिथे विश्रांतीला थाबला. गणेशला मनाप्रमाणे पलंग मिळाला. व तो झोपी गेला. झोपेतून उठल्यावर त्याने विचार केला जंगलातील पाणी पिऊन माझी तहान जाईना,मला थंडगार काही मिळालं तर... आणि आश्चर्य घडलं ,शेजारच्या झाडावरून नारळाचं शहाळं खाली पडलं. गणेश शहाळ्यातील थंडगार पाणी पिला व तृप्त झाला. गणेश मनात विचार करू लागला मी जो- जो विचार करतोय तेच सगळं इथं होतंय. पलंग विक्री करणारा माणूस निघून गेला. आता झाडाखाली गणेश एकटाच होता.गणेशने विचार केला,या जंगलात मी एकटाच आहे ,अचानक इथे एखादा वाघ आला व त्याने मला खाल्ले तर...असा विचार पूर्ण होईपर्यंत त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. आणि क्षणात तिथे वाघ आला व वाघाने त्याला फस्त केलं.
मृत्यूनंतर गणेश देवापुढे होता.
त्याने देवाला विचारलं,देवा माझ्याबाबतीत असं का केलं.?
पहिल्यांदा मला हवं ते दिलं आणि नंतर मला मृत्यूही दिला.
देव म्हणाला,"गणेश तू ज्या झाडाखाली होतास तो कल्पवृक्ष होता. कल्पवृक्ष म्हणजे मागेल ते देणारा. पहिल्यांदा तू विचार केला मला खायला मिळूदे,पलंग मिळूदे,थंडगार काहीतरी मिळू दे,ते सर्व तुला मिळालं.
पण तू नंतर नकारात्मक विचार केला,मला वाघाने खाल्लं तर. आणि झालंही तसंच.
देव म्हणाला मी माणसांना तेच देतो,त्यांना जे हवं असतं.
माणसाच्या मनात जे विचार येतात त्यावर मी फक्त म्हणतो "तथास्तू "
तुला हवं तेच मिळू दे.यात माझी काय चूक.
आताच्या काळात कल्पवृक्ष आहे की नाही माहिती नाही.परंतु आपल्या मनातील विचार हाच कल्पवृक्ष आहे.सकारात्मक विचार केला तर चांगलंच घडेल. नकारात्मक विचार केला तर वाईटच घडेल.
म्हणून नेहमीच सकारात्मक विचार करा.
पाहा,वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं,
सकारात्मक विचार करा.
शब्दांकन - अनिल वाव्हळ
9975381310
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा