नैतिकता
आपण विचार करतो का ? प्रिय वाचक मित्र,माझे स्नेही आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्र-मैत्रिणींनो .......
आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आपले मत ,आपल्या अपेक्षा, इतरांसमोर मांडत असतो. त्या पूर्ण कशा कराव्यात, किंवा आपणच आपल्या पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांचे ओझे, आयुष्यभर कसे सांभाळतो ? याचाही आपण बऱ्याचदा विचार करतो. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ,या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी या- ना त्याप्रकारे आपल्या पालकांची किंवा जोडीदाराची आपल्याला खंबीर अशी साथ मिळते. पण यासाठी आपल्यासमोर एखादे ध्येय असायला हवे. खरंतर ध्येयवादी आणि ध्येयवेडे हे दोन शब्द प्रकर्षाने वेगळे दिसत असले, तरी ते आपल्या जीवनात मोलाचा वाटा उचलत असतात .आपल्यातील प्रामाणिकता, सामंजस्यता जशी महत्त्वाची असते, तसाच नैतिकता हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
नैतिकतेबद्दल बोलायचे झाले ,तर खाजगीत बोलण्याचे, चालण्याचे ,सारे जीवनतरंग चारचौघात बोलले जातात. पण नको ते, नको त्या वयात ऐकल्यामुळे, पाहिल्यामुळे नैतिकतेचे बुरूज पार ढासळून जातात. हा विचार अनेकदा सर्वांच्याच मनात येतो. नैतिकतेचा विषय निघाला की लोक बोलणं बंद करतात, विषय बदलतात, कालांतराने तो विषय कायमचाच बंद होऊ पाहतो. पालकांनी मुलांशी, मुलांनी पालकांशी संवाद साधणे फार गरजेचे आहे. कारण यामध्ये अमुक- अमुक एकच गोष्ट येते असा सर्वांचा समज आहे .पण नैतिकता कोठेही, कधीही आणि केव्हाही, एकटी येत नाही हेही खरे.
नैतिकता ही एखाद्या सुंदर उक्तीप्रमाणे आहे.ज्ञानाचा बोध सोबत घेऊन येणारी नैतिकता ही सुंदरता आहे मनाला मोहवून टाकणारी आणि नैतिकता हे वचन आहे मनाने - मनाला दिलेलं. तुम्हां सर्वांच्या मनात विविध विचारांनी नक्कीच दाटी केली असणार. की खरंच नैतिकता कशी असते ? हो अशीच.... कारण मला पुन्हा एकदा प्रश्न पडतो ,की आपण विचार करतो का ?
नाही !आजच्या तरुण युवकांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये संवाद होत नाही असे दिसते .आणि त्यामुळे दोन पिढीमध्ये अंतर पडत आहे. महात्मा फुले यांच्या लेखनातील एक वाक्य आहे.पेशवाईत दुफळी माजली आणि इंग्रजांना देशात घुसता आलं .तसंच पालक आणि मुलांच्यात निर्माण होणाऱ्या दुफळीत अनैतिकतेचे बीज रोवले जात आहे .यावर उपाय एकच तो म्हणजे एकमेकांशी संवाद साधणं,इतरांना समजून घेणे, पैसा नसतानाही सुखी होता येतं हे समजणं. माझ्याकडे खूप काही आहे, म्हणून मी सुखी आहे, हे मुळातच चुकीचं आहे. कारण सुखी असण्यापेक्षा सुखी दिसण्याची धडपड आपल्याला फार केविलवाणी बनवत असते. आणि सरळ, स्वच्छ ,निर्मळ आयुष्य ,जगण्याचे सुख मात्र आपल्यापासून हळूहळू दूर निघून जाते. हेही लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे.
मित्रांनो ! संस्कार ही ,नैतिकतेची पहिली पायरी ,जो पार करतो, तो आयुष्यात स्वतःच्या पायावर ,स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या कर्मावर ठामपणे विश्वास ठेऊन उभा राहू शकतो. म्हणूनच आपल्याला आपले भावविश्व उज्वल करावयाचे असल्यास ध्येय ,कर्म ,तत्व यांच्याबरोबरच नैतिकता ही अंगीकारायला हवी.
ही विनंती🙏
पाहा, वाचा, विचार करा की आपण नैतिकतेचा खरंच विचार करतो का???
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा