गंधर्व आणि गंधर्वलोक.
नमस्कार वाचक मित्रहो.
सर्वप्रथम आज आपण देवादिकांचे मनोरंजन करणारे गंधर्व आणि गंधर्वलोक याविषयी माहिती घेणार आहोत.
गंधर्व म्हटंल आपल्याला कुतुहल वाटतं. गंधर्व म्हटंल की आपल्या डोळ्यासमोर येतात ते कलाकार. आणि लोकमान्य टिळक यांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना म्हटंलेलं वाक्य आठवतं. "अरे हे तर बालगंधर्व. गंधर्वांना अर्धदेव असेही म्हणतात. त्यांना देवांपैकी निम्नपदाचा दर्जा होता.गंधर्व ही एक व्यक्ती नसून ती एक जमात किंवा समूह होता. देवादिकांचे मनोरंजन करणारे कलाकार म्हणजेच गंधर्व होय. दक्षिण भारतात गंधर्वांची पूजा करतात. विद्येची देवता सरस्वती विणा वाजवताना गंधर्व या कलाकार समूहांचा जन्म झाला असं मानतात. गंधर्व जमातीचे,समूहचे अंतरिक्षात वास्तव्य असते असं मानलं जायचं. त्यांच्या वास्तव्य ठिकाणाला गंधर्वलोक असं म्हणतात.
स्वर्गात देवांच्या अनेक प्रजाती राहत होत्या.प्रजाती म्हणजेच प्रकार असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तेहतीस कोटी देव ही संकल्पना आपल्याकडे आहे. त्यापैकी गंधर्वांना अर्धदेव किंवा उपदेवांचा दर्जा होता. स्वर्गात वास्तव्य असणाऱ्या अप्सरा,किन्नर,यक्ष,आणि विद्याधर याप्रमाणेच गंधर्व अर्धदेव समजले जायचे.गंधर्व गायन,वादन,नृत्य,संगीत या कलेत प्रवीण असायचे.यापैकीच संगीतज्ञ गंधर्वराज पुष्पदंत हे देवांचा राजा इंद्रदेव यांच्या सभेतील गायक होते. गंधर्व हे अप्सरांचे पती असायचे असं मानलं जातं. स्वर्गात इंद्रदेवांच्या दरबारात अप्सरा या नृत्य करत तर गंधर्व मनोरंजन करत असत.
अथर्ववेदात गंधर्व लोकांतील गंधर्वांच्या संख्येविषयी माहिती मिळते. त्यावरून गंधर्वांची एकूण संख्य ही 6333 एवढी होती हे कळते. गंधर्व हे देव व माणूस यांमधील संदेशवाहक मानले जायचे. पृथ्वी ,पाताळ आणि स्वर्ग अशा तीनही ठिकाणी गंधर्वांचा वावर असे.गंधर्व हे कलाकार होते. गायक आणि वादक गंधर्व असत.संगीतावरही गंधर्व लोकांचे विशेष प्रेम होते. पंचशिखा हे गंधर्व विणेचे नाव होते.महाभारत आणि काही वेदांत गंधर्वांची काही नावे आढळतात. उग्रसेन,ऋतसेन,कलि,चित्रसेन,चित्ररथ,प्रियदर्शन,प्रियवंद ,सुदर्शन ही काही गंधर्वांची नावे आहेत. त्यापैकी चित्ररथ हे प्रमुख होते. अप्सरा या त्यांच्या पत्नी असत. चित्रसेन या गंधर्वांकडून पार्थ धनुर्धर अर्जुन गांधर्वअस्त्र व गांधर्वविद्या शिकले होते. पुढे अज्ञातवासात असताना त्यांना ही विद्या उपयोगी आली होती.
भारतातील जे काही प्राचीन ग्रंथ आहेत त्यापैकी जैन व बौद्ध धर्मात गंधर्व व गंधर्वसेनेचा उल्लेख सापडतो. गंधर्व लोक जसे कलाकार होते तसेच ते युद्धशास्त्रातही निपुण होते. त्यांची सेना देखील होती. या सेनेलाच गंधर्वसेना म्हटंल जायचं. गंधर्व लोकांकडे मायावी शक्ती देखील असायची. महाभारत काव्यात दानशूर कर्ण व चित्रसेन यांच्यात युद्ध झाल्यचा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर ज्येष्ठ कौरव दुर्योधन व गंधर्वसेना यांच्यातही युद्ध झाल्याचे दाखले मिळतात. आणि या युद्धत गंधर्वांनी दुर्योधनास पराभूत करून बंदी केलं होतं. पुढे वीर धनुर्धर अर्जुन व पांडवांनी दुर्योधनास मदत करून गंधर्वसेनेकडून त्यांची सूटका केली होती. याचेही महाभारतात दाखले आहेत.
जसं स्वर्ग हे ठिकाण आपण पाहिलेलं नाही. पण हे ठिकाण होतं असं आपण मानतो. त्याचा अनेक ग्रंथात आणि साहित्यात उल्लेख आढळतो.त्याच स्वर्गात देवादिकांचे मनोरंजन करणारे गंधर्व होते असं मानलं जाते. त्याचेही अनेक ठिकाणी संदर्भ मिळतात. आजही भारतीय कलाकारांना गंधर्व संबोधलं जातं. बालगंधर्व तर सर्वांनच ज्ञात आहेत.गायन,वादन,नृत्य यांसारख्या अनेक विद्यांना गांधर्वविद्या संबोधलं जातं.
देवलोकी कलाकार गंधर्व व गंधर्वलोक यांच्याविषयी मी उपलब्ध माहितीनुसार लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांपैकी कोणाला अधिक माहिती असेल तर त्यांनी कमेंट्स मध्ये सर्वांसाठी शेअर करावी. माहितीत भर घालावी.
संपर्क - अनिल वाव्हळ. (8830251992)
ब्लाॅगलेखन - निल विचार.
इमेल -Anilwavhal9@gmail.com
निलगंध यूटयूब चॅनल.
सुंदर वाचनीय लेख
उत्तर द्याहटवा